मुंबई : आगामी वेस्ट इंडिज दौ-यासाठी मी खूप उत्साहीत असून या दौ-यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणतेही दबाव नाही. मला आव्हान स्वीकारण्यास आवडतं आणि त्यामुळे ही माझ्यासाठी नवी संधी आहे, असा आत्मविश्वास भारताचा उपकर्णधार आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले. शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रहाणेने आपल्या तयारी विषयी सांगितले. विंडिज दौºयाविषयी रहाणे म्हणाला की, ‘‘हा माझा दुसरा विंडिज दौरा असून याआधी मी भारत ‘अ’ संघातून तेथे खेळलो होतो. मात्र आता सिनियर संघातून विंडिज दौ-यावर जात असून मी पुर्णपणे सज्ज आहे. या दौ-यासाठी खडतर सराव केला आहे. हा दौरा निश्चित आव्हानात्मक आहे, कारण विंडिज संघ कडवी टक्कर देण्याची क्षमता राखून आहे.’’उपकर्णधारपदाच्या जबाबदारीविषयी रहाणे म्हणाला, ‘‘या दौ-यासाठी मला उपकर्णधार म्हणून खूप चांगली जबाबदारी मिळाली आहे. मला आव्हानाला सामोरे जाऊन जबाबदारी पुर्ण करायला आवडते. उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणतेही दबाव नाही. गतवर्षीचा झिम्बाब्वे दौ-यामध्ये मी कर्णधार म्हणून खूप काही शिकलो.’’त्याचप्रमाणे, ‘‘प्रत्येक दौरा आव्हानात्मक असतो. प्रत्येक देशात वेगवेगळे आव्हान असते. या सर्वांना सामोरे जावून तुम्ही कसे यशस्वी होतात, हे महत्त्वाचे असते. उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रत्येक आव्हान पेलण्याची क्षमता राखून ठेवणे गरजेचे असते,’’ असेही रहाणेने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)माझे वडील सुपरहिरो...शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रहाणेला ‘तुझा आवडता सुपरहिरो कोण?’ असा प्रश्न केला. यावर रहाणे म्हणाला, ‘‘माझे वडील माझे आवडते सुपरहिरो आहेत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले असून त्यांच्यामुळे मी शिक्षण पुर्ण करु शकतो. खेळासोबतंच शिक्षणही खूप महत्त्वाच असते हे मला त्यांनी शिकवलं.’’यावेळी विद्यार्थ्यांनी रहाणेला तुझे आवडते विषय कोणते होते? असाही प्रश्न केला. यावर रहाणेने इतिहास आणि गणित माझे आवडते विषय होते. मी गणितात ठिकठाक होतो, पण इतिहास खूप आवडायचे. मला विविध विषयांवरील पुस्तकेही वाचायला आवडतात, असे सांगितले. तसेच शाळेत मी नेहमी फर्स्ट बेंचर होतो, असेही रहाणेने आवर्जुन सांगितले.
मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात - अजिंक्य रहाणे
By admin | Published: June 28, 2016 6:24 PM