लंडन : ॲथलेटिक्समध्ये ब्रिटनला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा आणि जगात महान मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या मोहम्मद फराहने त्याच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी तो नाही आहे ज्याला तुम्ही ओळखता. मी मूळचा ब्रिटनचासुद्धा नाही. माझे खरे नाव हुसैन अब्दी कहिन असून, सोमालियाला माझा जन्म झाला होता. बालकामगार म्हणून मला इंग्लंडमध्ये आणले गेले होते.’
बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्याने केलेल्या या खुलाशामुळे मोहम्मद फराह हे नाव क्रीडाविश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्याच्या या दाव्याने अनेकजण अचंबित झाले आहेत. तो पुढे म्हणाला, ‘मी ८ वर्षांचा असताना मला बालकामगार म्हणून एका दुसऱ्या मुलाच्या जागेवर ब्रिटनमध्ये आणण्यात आले होते. सोमालियामध्ये झालेल्या गृह युद्धात माझ्या वडिलांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे एक निर्वासित म्हणून आम्ही युकेमध्ये आलो.
जेवण मागताच मिळायची धमकी...फराहने खुलासा केला की, एका महिलेने त्याला ब्रिटनमध्ये आणले. तो म्हणाला, ‘ती महिला म्हणाली, तुला नातेवाइकांसोबत राहायला घेऊन जात आहे. तिने मोहम्मद फराह हे नाव मला दिले. तिच्याकडे बनावट दस्तावेज होते. त्यावर मोहम्मद फराह लिहिले होते. शिवाय फोटो चिकटवला होता. ब्रिटनमध्ये पोहोचताच त्या महिलेने माझ्याकडून नातेवाइकांची माहिती असलेला कागद घेतला. तो कागद दुसऱ्या क्षणी फाडलादेखील.