ऑनलाइन लोकमत
रांची, दि. ३ - भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार, कॅप्टन कूल नावाने ओळखला जाणा-या महेंद्रसिंग धोनीने एकदिवसीय सामने आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनाम देण्याची घोषणा करत बुधवारी चाहत्यांना धक्काच दिला. दोन वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी हा निर्णयही लवकरच घेईल याची अटकळ अनेकांनी बांधलेली होती, मात्र तरीही बुधवारी आलेल्या या बातमीने करोडो क्रिकेट चाहते हळहळले. कर्णधारपद सोडले असले तरीही संघात खेळण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. धोनीच्या या निर्णयानंतर क्रिकेट वर्तुळासह सोशल मीडियावरही अनेकांनी त्याच्याबद्दल गौरवास्पद उद्गार काढले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील त्याच्या योगदानाचे कौतुक करत त्याला विसरणे शक्य नसल्याचेही अनेकांनी म्हटले.
धोनीच्या सुखदु:खाच्या, तणावाच्या अनेक प्रसंगात खंबीरपणे साथ देणारी त्याची पत्नी साक्षीनेही सोशल मीडियावरून एक खास संदेश पोस्ट केला. ' जगात असं कोणतंच उंच शिखर नाही, की जे पादाक्रांत करण्यास तुला कोणी अडवू शकेल. मला तुझा अभिमान आहे' असे ट्विट साक्षीने केले.
लग्नानंतर साक्षी धोनीच्या प्रत्येक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित राहून त्याला पाठिंबा दर्शवत असे. त्याचप्रमाणे यावेळेसही साक्षीने आपल्या पतीसाठी ट्विट करत त्याचे पाठबळ वाढवले.
तर नुकताच धोनीच्या जीवनावर आधारित आलेल्या चित्रपटात धोनीची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानेही धोनीसाठी खास ट्विट केले. 'तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. लाखोंच्या (लोकांच्या) हास्याचे कारणही तूच आहेस. कॅप्टन तुला सलाम..!' असे सुशांतने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
There is no one like you.You're the reason for millions of smiles.Take a bow my Captain.
धोनी एकदिवसीय व टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचा निर्णय सर्वप्रथम बीसीसीआयद्वारे जाहीर करण्यात आला होता. ' भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याची इच्छा महेंद्रसिंग धोनीने बीसीसीआयला पत्राद्वारे कळवले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी तो उपलब्ध असणार आहे. पण तो कर्णधार म्हणून यापुढे कामगिरी सांभाळणार नाही. धोनीचा हा निर्णय निवड समितीला देखील कळविण्यात आला आहे' असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले होते.