ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. २२ - 'मी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय क्रिकेटच भलं होणार असल्यास मी कर्णधारपद सोडण्यास तयार आहे' असं सांगत महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. कालच्या सामन्यातील पराभवामुळे भारताने बांगलादेशविरुद्धची मालिका गमावली असून त्यानंतर धोनीनेे हे वक्तव्य केलं आहे.
बांगलादेशविरुद्दच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला असून तीन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी गमावली आहे. त्यामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होत असून ही गोष्ट कर्णधार धोनीच्या जिव्हारी लागली आहे. त्यातच पत्रकारांनीही धोनीवर प्रश्नांचा भडीमार केल्याने एरवी कूल राहून टोमणे परतवणारा धोनीही भडकला आणि त्याने मनातील खदखद बोलून दाखवत कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे.
'पराभवासाठी दर वेळेस मला जबाबादार ठरवलं जातं. जर मी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने सर्व गोष्टी ठीक होणार असतील तर मी तसं करायला अगदी तयार आहे. मी टीम इंडियाचा खेळाडू बनून खेळण्यास तयार आहे' असेही त्याने स्पष्ट केले.