मुंबई : आॅस्टे्रलियन ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडरर - राफेल नदाल यांनी सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. दुर्दैवाने मला हा सामना पुर्ण पाहता आला नाही, पण दोघांनी जो काही खेळ केला तो अद्भुत होता. मी फेडरराचा मोठा चाहता असून त्याच्या १८व्या ग्रँडस्लॅम विजेतपदाचा आनंद आहे, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सांगितले. तसेच, आगामी आॅस्टे्रलियाविरुध्द भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही, असेही तेंडुलकरने म्हटले.मुंबईत सोमवारी झालेल्या एका नामांकीत क्रीडा साहित्य बनविणाऱ्या कंपनीच्या कार्यक्रमात तेंडुलकर बोलत होता. ‘आॅस्टे्रलियन ओपनच्या अंतिम फेरीनंतर विजेत्या फेडररने सांगितल्याप्रमाणे दोघांनाही अंतिम फेरीत एकमेकांविरुध्द खेळण्याची कल्पना नव्हती. दोघांनी केवळ आपल्या खेळाचा आनंद घेतला. या दोन्ही दिग्गजांनी कायम आठवणीत राहणारे क्षण क्रीडाप्रेमींना दिले आहेत,’ असे तेंडुलकर म्हणाला. आगामी आॅस्टे्रलियाविरुध्दच्या मालिकेविषयी तेंडुलकर म्हणाला, ‘चार कसोटींच्या मालिकेत भारत नक्कीच संभाव्य विजेता असेल. मात्र तरीही, कांगारुंना गृहित धरता येणार नाही. भारतीय परिस्थितींमध्ये खेळणे अवघड असून आॅस्टे्रलियन संघाला याची जाणीव आहे.’ त्याचप्रमाणे, ‘सध्या टीम इंडिया ज्याप्रकारे खेळत आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. परंतु, तरीही कोणतीही गोष्ट गृहित धरण्याची चूक महागात पडू शकते. आपला संघ सर्वोत्तम तयारी करुन मैदानात उतरेल यात शंका नाही. आॅस्टे्रलियाचा सामना करणे कठीण असेल आणि नेहमीच असे राहिले आहे. मात्र, मला भारतीय संघावर विश्वास आहे,’ असेही तेंडुलकरने म्हटले. आपल्या अखेरच्या कसोटी सामन्याबाबत तेंडुलकर म्हणाला, ‘मला नेहमी पाठिंबा दिलेल्या चाहत्यांसाठी व देशासाठी त्या सामन्यात मी माझ्या बॅटला ‘तिरंगा’ रंग चढवला होता.(क्रीडा प्रतिनिधी)स्वच्छ भारत सोबत स्वस्थ भारतही महत्त्वाचेसचिनने यावेळी म्हटले की, ‘आज जगात भारताची ओळख ‘युवा’ अशी आहे. परंतु, जंक फुड आणि व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे आपली युवा पिढी तंदुरुस्त नाही. त्यामुळेच आपल्याला आज स्वच्छ भारत अभियानासह स्वस्थ भारत अभियानाचीही गरज आहे.’
मी रॉजर फेडररचा मोठा चाहता - तेंडुलकर
By admin | Published: January 31, 2017 4:31 AM