नवी दिल्ली : रियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावणाऱ्या देवेंद्र झांझरियाने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक टोमणे ऐकावे लागले, पण माझी आई माझ्या ठामपणे पाठीशी उभी राहील्याने मी घडलो असल्याचे सांगितले.झांझरिया म्हणाला, ‘मी जेव्हा खेळण्यास प्रारंभ केला तेव्हा अनेकांनी मला टोमणे मारले. मी का म्हणून भाला फेकतोय? यातून काहीही साध्य होणार नाही, असेही सुनावले. मी कधीच पॅराथलिट होऊ शकत नाही, असे काहीजणांचे म्हणणे होते. मात्र, लोकांनी जरी मला निराश केले तरी माझ्या आईने मला नेहमीच प्रोत्साहन दिले. मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे. तिने मला नेहमीच चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन दिले. मला सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्यासाठी तिने मला मदत केली.’ झांझरिया म्हणाला, ‘मी जेव्हा फिनलॅँडमध्ये प्रशिक्षण घेत होतो, तेव्हा माझी मुलगी वर्गात प्रथम आली. तिने मला ही आनंदाची बातमी सांगितली व सुवर्णपदकच घेऊन येण्यास सांगितले.’ (वृत्तसंस्था)
आईमुळेच मी घडलो : झांझरिया
By admin | Published: September 24, 2016 5:24 AM