नवी दिल्ली : सन २००८ साली झालेल्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना मला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा सलग दोन आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू सुशील कुमार याने केला आहे. ‘माय आॅलिम्पिक जर्नी’नामक पुस्तकामध्ये सुशीलने सांगितले की, त्याने बीजिंंग आॅलिम्पिकनंतर मिळालेल्या निवृत्तीच्या सल्ल्यानंतरही खेळण्याचे ठरवले होते. कारण त्याच्या मते हा शेवट नसून ही खरी सुरुवात होती. यानंतर त्याने चार वर्षांनी २०१२ लंडन आॅलिम्पिकमध्ये कामगिरीत सुधारणा करताना रौप्यपदक पटकावून सलग दोन आॅलिम्पिकमध्ये देशासाठी वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला. सुशीलने या पुस्तकामध्ये खुलासा केला आहे की, ‘‘मी बीजिंग आॅलिम्पिकनंतर भारतात आल्यावर माझ्या शुभचिंतकांनी सर्वोच्च स्थानी असताना निवृत्ती घेण्याबाबत सुचवले. मी द्विधा मनस्थितीमध्ये पडलो. इतक्या वर्षांनी अखेर मला कळले की, आॅलिम्पिक पदक विजेता होणे म्हणजे काय असते आणि ते लक्ष्य साधण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते. आॅलिम्पिक कांस्यपदक पटकावल्यानंतरच मी कुस्तीकडे अधिक बारीकपणे लक्ष दिले. विविध प्रयोग केले. त्यामुळे हा शेवट नव्हता, तर नवीन सुरुवात होती.’’ (वृत्तसंस्था)याआधी मी आॅलिम्पिक पदक विजयाकडे गांभीर्याने लक्ष देत नव्हतो. मात्र जेव्हा बीजिंग आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकलो तेव्हा मला याचे महत्त्व कळाले. यानंतर मी माझ्या खेळात अधिक सुधारणा करण्यास सुरुवात केली. मी अधिक मेहनतीने सराव केल्याचे फळ पुढील आॅलिम्पिकमध्ये मिळाले. याआधी १९५२ साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये पहिले पदक जिंकले होते, याची मला काहीच कल्पना नव्हती. घरी आल्यानंतर मला माझ्या पदकाचे महत्त्व कळाले होते. - सुशील कुमार
बीजिंग आॅलिम्पिकनंतर मला निवृत्तीचा सल्ला मिळाला होता
By admin | Published: June 27, 2016 4:05 AM