राजकोट : टीकाकार आता आम्हाला लक्ष्य करू शकत नाहीत, कारण कसोटी सामना अनिर्णीत कसा राखायचा हे आम्हाला कळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. इंग्लंडविरुद्ध रविवारी पहिला कसोटी सामना अनिर्णीत झाल्यानंतर तो बोलत होता. विराट म्हणाला, ‘‘सामना बरोबरीत कसा सोडवायचा, हे आम्हाला कळाले आहे. यापूर्वी बऱ्याच लोकांना आमच्याबाबत साशंकता असेल. कारण आम्ही सामने जिंकले आहेत किंवा गमावले आहेत.’’विराट पुढे म्हणाला, ‘‘मी जडेजाला सांगितले, की आपल्याकडे आपली कामगिरी सुधारण्याची ही चांगली संधी आहे. भविष्यात आपल्याला अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सामना कसा अनिर्णीत राखायचा, हे आम्हाला कळाले आहे. अशा स्थितीत कसे खेळायचे, याची कल्पना आलेली आहे. या लढतीतून बरेच काही शिकायला मिळाले. दडपणाखाली असताना परिस्थितीनुरूप खेळ करणे आवश्यक असते.’’विराटने जडेजाव्यतिरिक्त आश्विनचीही प्रशंसा केली. आश्विनने पहिल्या डावात ७० धावा फटकावल्या होत्या. विराट म्हणाला, ‘‘आश्विन व जडेजा यांच्या चमकदार फलंदाजीमुळे आम्हाला अडचणीच्या स्थितीतून सावरता आले.’’भारतीय फिरकीपटूंच्या तुलनेत पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. याबाबत विराट म्हणाला, ‘‘मला तसे वाटत नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी केली; पण आमच्या फिरकीपटूंना पिछाडीवर सोडले, असे वाटत नाही. त्यांनी चार-पाच बळी घेऊन सामन्याला कलाटणी दिली, असे घडले नाही. जर त्यांनी आमच्या फिरकीपटूंच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असती, तर त्यांनी सामना जिंकला असता.’’ (वृत्तसंस्था)
सामना अनिर्णीत कसा राखायचा याची माहिती आहे
By admin | Published: November 15, 2016 1:13 AM