ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31 - अष्टपैलू हार्दिक पांड्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान ‘फिनिशर’ची भूमिका वठवू इच्छितो. हे काम कठीण असले तरी मला पसंत आहे, असे पांड्या म्हणाला.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याकडून टिप्स घेत पांड्याने बांगला देशविरुद्ध सराव सामन्यात डेथ ओव्हरमध्ये ५४ चेंडूत नाबाद ८० धावांचा झंझावात केला. तो म्हणाला,‘ फिनिशरची भूमिका बजावणे चांगले आहे, पण सोपे नाही. याबाबतीत परिस्थितीसोबत सांगड घालून खेळावे लागते. माझा आत्मविश्वास वाढल्यामुळे मला आता ही भूमिका वठविणे पसंत आहे.’
पांड्याने ३३ व्या षटकांत क्रीजवर पाय ठेवला. त्याने अखेरच्या चेंडूपर्यंत एक टोक सांभाळले. आल्या- आल्या नैसर्गिक फटकेबाजी करणे इंग्लंडमध्ये सोपे काम नाही. परिस्थितीशी ताळमेळ साधताच मी फटके मारायला सुरुवात केली.’
भारताला पाकिस्तानविरुद्ध ४ जून रोजी पहिला सामना खेळायचा आहे. याचे संघावर कुठलेही दडपण नसल्याचे पांड्याने सांगितले. तो म्हणाला,‘ हा सामना अन्य सामन्यासारखाच असेल. चांगला खेळ करीत विजयाची खात्री करण्याचे आव्हान आहे.’
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सराव सामन्यात गोलंदाजीत पांड्या प्रभावी जाणवला नाही. यावर तो म्हणाला,‘ भारतातील परिस्थिती आणि येथील परिस्थितीत फार फरक आहे. मी पहिल्या सामन्यात फूल लेंग्थ चेंडू टाकायला हवे होते. माझ्या तुलनेत उमेश यादव आणि भुवनेश्वर यांनी चांगला मारा केला. दोघेही येथे आधी खेळले असल्याने त्यांना जाणीव आहे. मी देखील त्यांच्या मागंदर्शनात शिकण्यास प्राधान्य देणार आहे.