मुंबई : मुंबई इंडियन्सच्या आयपीएल आठमधील पहिल्या क्वॉलिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जवरील विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या केरॉन पोलार्डने, त्यांच्या संघाने येथे शानदार खेळ केल्याचे म्हटले आहे.मुंबई इंडियन्सने दोन वेळेसचा चॅम्पियन चेन्नईला काल रात्री वानखेडे स्टेडियमवर २५ धावांनी पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली. पोलार्डने १७ चेंडूंत ४१ धावा केल्या.आपल्या वादळी खेळीत पाच षटकार ठोकणारा पोलार्ड म्हणाला की, ‘आम्ही शानदार खेळ केला. दोन झेल वगळता ही शानदार कामगिरी होती. क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आम्ही प्रारंभीच्या स्थितीतून नंतर जोरदार मुसंडी मारली आणि येथे हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचणे ही संघाच्या दृष्टीने मोठी उपलब्धी आहे.’पोलार्ड मुंबईच्या खराब सुरुवातीचा उल्लेख करीत होता. सुरुवातीला मुंबईने सलग चार सामने गमावले; परंतु त्यानंतर त्यांनी पुढील ११ पैकी ९ सामने जिंकताना अंतिम फेरी गाठली.मुंबईने लेंडल सिमन्सच्या ६५ धावा आणि पोलार्डच्या वादळी फलंदाजीच्या बळावर ६ बाद १८७ धावा केल्या आणि चेन्नईला १६२ धावांत सर्वबाद केले. पोलार्डने सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीला एकाच षटकात सलग चेंडूंवर बाद केलेले हरभजनसिंगचे ते षटक सामन्यातील ‘टर्निंग पॉइंट’ असल्याचे सांगितले.तो म्हणाला की, ‘आम्हाला चांगली सुरुवात हवी होती आणि काही विकेट्सही मिळवायच्या होत्या. भज्जीची पहिली दोन षटके चांगली ठरली नाहीत; परंतु त्याच्या तिसऱ्या षटकानंतर सामन्याचे चित्रच पालटले गेले. रैना आणि धोनी दोन चेंडूंच्या आतच बाद झाल्याने सामन्याचे चित्र पालटले.’ हरभजनने २६ धावांत २ गडी बाद केले. तथापि, लसिथ मलिंगा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३३ धावांत ३ गडी बाद केले.पोलार्ड म्हणाला की, ‘ही पूर्णपणे सांघिक कामगिरी होती. भज्जी, विनय कुमारने चांगली गोलंदाजी केली. मलिंगानेही सुरेख गोलंदाजी केली. मॅक्कलेनघनची धुलाई झाली; परंतु त्याने रवींद्र जडेजाच्या रूपाने महत्त्वपूर्ण बळी मिळवला. अखेर सर्वांनीच योगदान दिले. एक संघ म्हणून विजय मिळवणे हे आमच्यासाठी चांगले ठरले. सलामीवीर सिमन्स व पार्थिव यांनी चांगली पायाभरणी केली. ते गेल्या दोन सामन्यांपासून अशीच कामगिरी करीत आहेत. मध्यात ते थोडे संथ झाले; परंतु टी-२0 क्रिकेट आहे.’पोलार्डने चार दिवस विश्रांती मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला. तो म्हणाला की, ‘जर आम्हाला पुन्हा खेळावे लागले असते, तर फक्त दोनच दिवसांची विश्रांती मिळाली असती; परंतु आता आम्हाला चार दिवस विश्रांतीसाठी मिळणार आहे. १८७ ही धावसंख्या चांगली होती. चेन्नई संघ बलाढ्य आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यांनी साखळी सामन्यात येथे आमच्यावर मोठा विजय मिळवला होता; परंतु आज आम्ही ज्या स्थितीत आहोत याचे श्रेय सर्वच खेळाडूंना जाते.- केरॉन पोलार्ड
चेन्नईविरुद्ध चांगला खेळलो
By admin | Published: May 21, 2015 12:23 AM