मुंबई : आज इतक्या वर्षांनंतरही लोक मला ओळखतात, याची खरंच कल्पना नव्हती. अपघाताने मी या खेळाकडे वळालो आणि याच क्रिकेटने मला आजवर खूप दिले असून त्याचा मी ऋणी आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया भारताला परदेशी भूमीवर पहिला विजय मिळवून देणारे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी दिली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल, श्रीफल व चंदेरी बॅट देऊन वाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मंगळवारी वाडेकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ‘आपला लाडका अजित’ कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार व मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. या वेळी माधव आपटे, मिलिंद रेगे, सुनील गावसकर, प्रवीण आमरे, मोहमद अझरुद्दिन, विनोद कांबळी या माजी क्रिकेटपटूंनी वाडेकर यांच्यासह जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या ७५व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या दिमाखदार सोहळा आणि त्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या आपल्या चाहत्यांकडे पाहून भारावलेले वाडेकर यांनी सांगितले, ‘‘मी शाळेत कधीही क्रिकेट खेळलो नाही. मात्र, रुईया महाविद्यालयामध्ये शिकत असताना एका सामन्यादरम्यान १२व्या खेळाडूची आवश्यकता असताना मला निवडले गेले. या वेळी माझ्यावर केवळ पाणी देण्याचे काम सोपविले होते आणि त्यासाठी दिवसाला ३ रुपये मिळणार होते. आज त्या ३ रुपयांनी मला जी किंमत दिली, ती मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. या ३ रुपयांनी माझे आयुष्य बदलून टाकले.’’ (क्रीडा प्रतिनिधी)जोपर्यंत भारतात क्रिकेट आहे, तोपर्यंत कोणीही वाडेकर यांना विसरणार नाही. भारतीय क्रिकेटला आपण परदेशातही जिंकू शकतो, असा विश्वास वाडेकर यांनी दिला. भारत केवळ घरच्या मैदानावरच जिंकू शकतो, ही मानसिकता वाडेकर यांनी बदलली. भारतीय क्रिकेटमध्ये अनेक सुवर्णपाने आहेत; मात्र वाडेकर यांनी लिहिलेल्या सुवर्णपानाशिवाय भारतीय क्रिकेट कधीच पूर्ण होणार नाही.केवळ खेळाडू म्हणूनच नाही, तर व्यक्ती म्हणूनही वाडेकर हे एक अष्टपैलू आहेत. खेळाडू, फलंदाज, कर्णधार त्यानंतर व्यवस्थापक अशा सर्वच जबाबदाऱ्या त्यांनी ठामपणे सांभाळल्या. केवळ सांभाळल्याच नाहीत तर त्यांना साजेशी योग्य कामगिरीही वाडेकर यांनी केली.- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
अजूनही मी लोकांच्या आठवणीत!
By admin | Published: June 01, 2016 3:36 AM