नवी दिल्ली : भारतीय भारोत्तोलनपटू संजिता चानूने निर्दोष असल्याची प्रतिक्रिया देताना डोप चाचणीमध्ये अपयशी ठरल्यामुळे तिच्यावर करण्यात आलेल्या अस्थायी निलंबनाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. संजिता म्हणाली,‘मी निर्दोष आहे. मी बंदी असलेला कुठल्याही पदार्थाचे सेवन केलेले नाही. मी राष्ट्रीय महासंघाच्या मदतीने या निलंबनाच्या कारवाईला आव्हान देणार आहे.’गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजनगटात सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली संजिता टेस्टोस्टेरोनसाठी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने (आयडब्ल्यूएफ) निलंबनाची कारवाई केली. तिचा नमुना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील एनाहीममध्ये विश्वचॅम्पियनशिपपूर्वी घेण्यात आला होता.संजिताला भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव यांचा पाठिंबा आहे. त्यांनी गुरुवारीच मणिपूरची ही खेळाडू निर्दोष असल्याचे म्हटले होते. यादव म्हणाले,‘कुठल्याही प्रकरणात आम्ही ‘ब’ नमुन्याच्या चौकशीबाबत लिहितो. निकाल मिळाल्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय महासंघाकडे दाद मागण्यासाठी वकिलाची मदत घेऊ.संजिताने कुठल्याही प्रकारचे बंदी असलेले औषध घेतलेले नाही, असा मला ठाम विश्वास आहे. आम्ही तिला निर्दोष सिद्ध करण्यात यशस्वी ठरू, असा मला विश्वास आहे.’त्याचसोबत यादव म्हणाले की, संजिताने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेले जे सुवर्णपदक आहे ते हिसकावण्याचा कुठला धोका नाही. संजिताने ५३ किलो गटात एकूण १९२ किलो वजन पेलताना सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. तिने २०१४ मध्ये ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले होते. जर संजिताचा ‘ब’ नमुनाही पॉझिटिव्ह आढळला तर तिच्यावर चार वर्षांच्या निलंबनाची कारवाई होऊ शकते. संजिता गेल्या वर्षी ५३ किलो वजन गटात विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. त्यात तिला १३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी या २४ वर्षीय खेळाडूचा ९ मे रोजी क्रीडा मंत्रालयाने टॉप्स (लक्ष्य आॅलिम्पिक पोडियम) योजनेत समावेश केला, पण डोपिंगमध्ये नाव आल्यानंतर तिला या योजनेतून वगळल्या जाऊ शकते.या प्रकरणामुळे भारतीय भारोत्तोलनला मोठा धक्का बसला आहे. भारताच्या भारोत्तोलकांची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्यात विश्व चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो वजनगटात सुवर्णपदकाची मानकरी ठरलेल्या मीराबाई चानूचाही समावेश आहे. भारतीय भारोत्तोलनपटूंसाठी २०१६ हे वर्ष डोपमुक्त राहिले, पण २०१७ मध्ये एक खेळाडू सुशीला पवार आंतरराष्ट्रीय महासंघाच्या चाचणीमध्ये दोषी आढळली होती. संजिताचे प्रकरण डोप चाचणीत दोषी आढळलेल्या भारतीय खेळाडूचे यंदाचे पहिलेच प्रकरण आहे. आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या दबावाखाली अलीकडेच आयडब्ल्यूएफने टोकियो आॅलिम्पिकमध्ये डोपिंग प्रकरणे अधिक आढळणाऱ्या देशांचा कोटा मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. संजिता प्रकरणापूर्वी २००८ पासून आतापर्यंत १२ भारतीय भारोत्तोलनपटू आंतरराष्ट्रीय महासंघातर्फे करण्यात आलेल्या डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळले आहेत. (वृत्तसंस्था)
मी निर्दोष, निलंबनाच्या शिक्षेला आव्हान देणार : संजिता चानू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:04 AM