- गुरुदास कैथवासनवी दिल्ली/पानिपत : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून नीरज चोप्राने इतिहास रचला. या गौरवशाली क्षणाच्या वेळीही तो अशा एका महान अॅथलिटची आठवण काढत होता, ज्यांना नीरजप्रमाणेच पोडियमवर उभे राहून राष्ट्रगीताची धून ऐकायची होती. एका महान अॅथलिटची ही ओळख आहे. इतके मोठे यश मिळवूनही नीरजचे साधेपण हैराण करणारे आहे. या यशाच्या निमित्ताने नीरजने आपले स्वप्न आणि आतापर्यंतच्या प्रवासाबाबत गप्पा मारल्या आहेत.भारताचा पहिला ट्रॅक अॅण्ड फील्ड मेडलिस्ट बनल्यावर कसे वाटते?nभारतासाठी अॅथलेटिक्समध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकल्याने आनंद आहे. त्यातही ते सुवर्ण पदक असल्याने आनंदाला मर्यादा नाहीत. ही भारतीय खेळाच्या नव्या दौऱ्याची सुरुवात आहे. गळ्यात सुवर्णपदक टाकून उभे राहणे माझ्यासाठी गर्वाचा क्षण होता. स्टेडियममध्ये तिरंगा वरती जात होता आणि राष्ट्रगीताची धून वाजत होती, हा क्षण अविस्मरणीय आहे. २०१९ साली माझ्या उजव्या कोपऱ्याला दुखापत झाली होती आणि त्यानंतर कोरोनामुळे फार वेळ वाया गेला. त्यामुळे हे सुवर्णपदक या वाईट आठवणींना विसरण्यास मदत करेल. प्रत्येक खेळाडू आपल्या कारकीर्दीत ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहतो. मी येथे सुवर्ण जिंकले असल्याने याहून जास्त आता मी काय मागू शकतो? मी खूप आशावादी असून, नशिबावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आतापर्यंत ज्या काही अडचणी आल्या, ते माझ्यासाठी चांगलेच ठरले असे वाटते.अंतिम फेरीतील फेकीनंतर काय विचार सुरू होते? सुवर्ण जिंकतो असे कधी वाटले?nअंतिम फेरीत मी केवळ माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निश्चय केला होता. माझी देहबोली माझ्या फेकीसह ताळमेळ साधेल यावरच मी लक्ष केंद्रित केले होते. भालाफेकमध्ये तंत्राला फार महत्त्व असते. येथे तुम्हाला थंड डोक्याने आणि शांत राहावे लागते. राष्ट्रीय विक्रम मोडायचा किंवा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करायचा, याचा मी विचार करत नव्हतो. ऑलिम्पिक सुवर्णपदकाची स्वत:ची वेगळी चमक आणि किंमत असते. जेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडू आपल्या अखेरच्या प्रयत्नात सर्वश्रेष्ठ कामगिरी करू शकलो नाही, तेव्हा मी सुवर्ण जिंकल्याची खात्री झाली.सुवर्णपदक मिल्खा सिंग यांना समर्पित करण्यामागे काय विचार आहेत?मी मिल्खा सिंग यांच्या कारकीर्दीतील अनेक व्हिडिओ पाहिले आहेत. ट्रॅक अॅण्ड फील्डमध्ये भारतीय खेळाडूला पोडियमवर पाहण्याची त्यांची इच्छा होती. रोम १९६० ऑलिम्पिकमध्ये ते पदकाच्या अत्यंत जवळ पोहोचले होते. त्यामुळे एकदा तरी भारतीय खेळाडू अॅथलेटिक्सच्या पोडियमवर पोहोचावा अशी त्यांची इच्छा होती. सुवर्ण जिंकल्यावर जेव्हा राष्ट्रगीताची धून वाजली, तेव्हा त्यांचे शब्द मला आठवले आणि मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. दु:ख याचेच आहे की, आज हा क्षण पाहण्यासाठी ते आपल्यासोबत नाहीत; पण पोडियमवर उभा राहिलो असताना, मी त्यांचाच विचार करत होतो. यानंतर मी माझे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करण्याचे ठरविले. हेच स्वप्न पी.टी. उषा यांनीही पाहिले होते आणि आज त्यांचेही स्वप्न पूर्ण करण्यात मला यश आले आहे.नीरजचे पुढील लक्ष्य काय?घरी जाऊन विजयाचा जल्लोष करायचा आहे. आईच्या हातचा चुरमा खाणार आहे. मी नक्कीच विश्रांती घेणार असून, चांगली झोप घेणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई क्रीडा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयारी करीन.अंतिम फेरीआधी क्लॉसने काय सांगितले होते?nक्लॉस यांनी सांगितले होते की, ‘पात्रता फेरीप्रमाणेच येथेही सर्वोत्तम कामगिरी कर. कोणत्याही गोष्टीला आशेच्या भरवशावर सोडू नकोस. दुसऱ्यांना कोणतीही संधी देऊ नकोस.’ अंतिम फेरीआधी मी माझे काका भीम चोप्रा आणि बालपणीचे प्रशिक्षक जयवीर यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनीही मला हेच सांगितले होते. शनिवारी काहीतरी चांगले घडणार असल्याची त्यांना खात्री होती आणि तसेच झाले.लोकांच्या म्हणण्यानुसार तुझ्या बायोपिकमध्ये तूच तुझा रोल करावास... काय सांगशील?सध्या मी माझ्या खेळावर लक्ष देत आहे. बायोपिक प्रतीक्षा करू शकते. जेव्हा मी निवृत्त होईन, तेव्हा बायोपिक बनवता येईल. मी आणखी यश मिळवू इच्छितो. भारतासाठी मला आणखी पदके जिंकायचे आहेत. अॅथलिट म्हणून मला आणखी यश मिळवयाचे असून, जेव्हा मी निवृत्त होईन तेव्हा माझ्यासोबत अनेक गोष्टी जोडलेल्या असतील, अशी आशा आहे. तिरंगा फडकताना, राष्ट्रगीताची धून ऐकताना काय भावना होत्या?तो क्षण विसरणार नाही. आतापर्यंत जो त्याग केला आहे, जी मेहनत घेतली आहे, त्याचे फळ मिळाल्याचे वाटले. त्या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. त्यांचा केवळ अनुभव घेता येईल. हा अनुभव कसा असतो ते माहीत आहे मला. सोशल मीडियावर खूप कौतुक झाले, याकडे कसे पाहतोस?होय, ऑलिम्पिक यशानंतर सोशल मीडियावर माझे फॉलोअर्स वाढले आहेत. लोक आता मला ओळखू लागलेत, ही चांगली बाब आहे. त्यांना माझ्यात एक स्टार दिसत आहे; पण मी माझ्या खेळावर लक्ष देतो. रिकाम्या वेळामध्येच मी सोशल मीडियावर असतो. हे केवळ मनोरंजनाचे साधन आहे.
मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 9:02 AM