नवी दिल्ली : चौथ्या मानांकित थायलंडच्या रत्चानोक इंतानोनने आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या ली जुईरुईचा २१-१७, २१-१८ ने पराभव करीत रविवारी इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेत महिला एकेरीत जेतेपदाचा मान मिळवला. सिरीफोर्ट स्पोटर्््स कॉम्प्लेक्समध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत इंतानोनने तिसऱ्या मानांकित चीनच्या खेळाडूचा ४२ मिनिटांमध्ये पराभव केला. पुरुषांच्या एकेरीत जपानच्या केंटो मोमोताने डेन्मार्कच्या विक्टर अक्सेलसनचा २१-१५, २१-१८ असा सरळ दोन सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर आपली मोहोर उमटविली.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या इंतानोनने दुसऱ्या क्रमांकावरील जुईरुईविरुद्ध कारकिर्दीत ११ व्यांदा खेळताना चौथा विजय मिळवला. भारतीय स्टार सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभूत करणाऱ्या जुईरुईला जेतेपदाचा दावेदार मानले जात होते, पण थायलंडच्या खेळाडूने अंतिम लढतीत शानदार कामगिरी करताना चीनच्या खेळाडूला चुका करण्यास बाध्य केले. पहिल्या गेममध्ये इंतानोनने १५-१५ अशा बरोबरीनंतर सलग तीन गुण वसूल करीत १८-१५ अशी आघाडी घेतली व २१-१७ ने गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये इंतानोनने ७-१ अशी दमदार आघाडी घेतल्यानंतर मागे वळून बघितले नाही. इंतानोनने दुसरी गेम २१-१८ ने गेम जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत महिला दुहेरीत जपानने, मिश्र दुहेरीत चीनने तर पुरुष दुहेरीत इंडोनेशियाने बाजी मारली. महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत तिसऱ्या मानांकित जपानच्या मिसाकी मत्सुतोमो व अयाका ताकाहाशी यांनी मायदेशातील सहकारी नाओका फुकुमॅन व कुरुमी योनाओचा ५७ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१८ ने पराभव केला. मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत चीनची जोडी लू केई व हुआंग याकियोंग यांनी इंडोनेशियाची जोडी रिकी विदियांतो व पुष्पिता रिची डिली यांचा ४० मिनिटांमध्ये २१-१३, २१-१६ ने पराभव करीत जेतेपद पटकावले. पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या गिडियोन मार्कस फेर्नाल्डी व केव्हिन सुकामुलजो जोडीने मायदेशातील सहकारी एंगा प्रात्मा व रिकी सुवार्दी यांचा ३० मिनिटांमध्ये २१-१७, २१-१३ ने सहज पराभव केला. (वृत्तसंस्था)
इंतानोन, मोमोता अजिंक्य
By admin | Published: April 04, 2016 2:25 AM