कार्डिफ : शाकिब-अल-हसन (११४ धावा, ११५ चेंडू, ११ चौकार, १ षटकार ) व महमुदुल्ला (नाबाद १०२) यांनी वैयक्तिक शतके झळकावित चौथ्या विकेटसाठी २२४ धावांच्या केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी न्यूझीलंडचा १६ चेंडू व ५ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. बांगलादेशने न्यूझीलंडचा डाव ८ बाद २६५ धावांत रोखला आणि विजयसाठी आवश्यक धावा ४७.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या पराभवासह न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याआधी, आॅफ स्पिनर मोसद्देक हुसेन याने निर्णायक टप्प्यात पाठोपाठ तीन धक्के देत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील अखेरच्या सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंडला ५० षटकांत ८ बाद २६५ धावांपर्यंत मर्यादित ठेवले. २१ वर्षांचा अष्टपैलू मोसद्देकने १२ चेंडूत तीन गडी बाद करताच सामन्याचे चित्र पालटले. ४४ व्या षटकांत त्याने नील ब्रूम(३६) आणि कोरे अॅण्डरसन(००) यांना बाद केले. ४६ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीला आला तेव्हा जेम्स नीशामला(२३)त्याने पॅव्हेलियनची वाट दाखविली. तीन षटकांच्या गोलंदाजीत त्याने १३ धावांत तीन गडी बाद केले. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझाने ४२ व्या षटकांत मोसद्देककडे चेंडू सोपविला त्याचा हा निर्णय ‘मास्टर स्ट्रोक’ सिद्ध झाला. न्यूझीलंडला अखेरच्या दहा षटकांत केवळ ६२ धावा काढता आल्या.त्याआधी, नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात झकास झाली. कर्णधार केन विलियम्सन याने ६९ चेंडूत ५७ आणि रॉस टेलरने ८२ चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले. निर्णायक टप्प्यात फलंदाजांना धावांची लय राखण्यात अपयश आल्याने न्यूझीलंडला ३०० चा पल्ला गाठणे कठीण गेले. ३९ षटकांत ३ बाद २०१ अशी स्थिती होती. गुप्तिल (३३) आणि ल्यूक रोंची(१६) हे फॉर्ममध्ये असताना आठव्या षटकांत बाद झाले. त्यानंतर विलियम्सन आणि टेलर यांनी खेळाची सूत्रे सांभाळली.(वृत्तसंस्था)
ICC Champions Trophy 2017 - बांगलादेशचा न्यूझीलंडला "दे धक्का"
By admin | Published: June 10, 2017 4:47 AM