ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 31 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ मैदानाबाहेर काही वेगळ्या समस्यांचा सामना करीत असले तरी, सध्याचा चॅम्पियन भारत आणि बलाढ्य ऑस्ट्रेलिया हेच चॅम्पियन्सचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यजमान इंग्लंडने गेल्या दोन वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये लक्षणीय सुधारणा केली. त्यामुळे आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील ‘छुपा रुस्तम’ इंग्लंडच आहे. इंग्लंडची उद्या सलामी बांगला देशविरुद्ध होणार असली तरी, सर्वांना प्रतीक्षा आहे ती ४ जून रोजी होणा-या भारत- पाकिस्तान लढतीची. दुसरीकडे फलंदाजीसाठी आदर्श असलेल्या येथील खेळपट्ट्यांवर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आकर्षणाचे केंद्र आहेत. उभय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा असून, वनडे क्रिकेटमध्ये ही आवश्यक बाब मानली जाते.
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याचे वृत्त चर्चेचा विषय ठरले. आॅस्ट्रेलियन खेळाडूंचे क्रिकेट बोर्डासोबत वेतनावरून बिनसले आहे. त्यामुळे दोन्ही संघ उत्साहात सुरुवात करततील असेही नाही. पण दोन्ही संघांकडे दिग्गज खेळाडू आहेत. वादाचा त्यांच्या खेळावर परिणाम होत नाही.
भारतीय संघाच्या दोन्ही सराव सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये तणाव जाणवला नाही. दोन्ही सामने सहज जिंकले तर आॅस्ट्रेलियाने सराव सामन्यात देदीप्यमान कामगिरी केली. भारतीय संघात २०१३ च्या स्पर्धेतील नऊ खेळाडू आहेत. कोहलीसाठी ही पहिलीच मोठी परीक्षा असेल. शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज आणि धोनी यांच्या समावेशामुळे लाईनअप सर्वात अनुभवी आहे. याशिवाय केदार जाधव आणि दिनेश कार्तिक हे स्वबळावर सामना फिरविण्याची ताकद बाळगतात. अष्टपैलू हार्दिक पांड्या संघात संतुलन निर्माण करतो तर उमेश यादव, भुवनेश्वर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, फिरकीत रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे धावांवर अंकुश लावू शकतात.
ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर, कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अॅरोन फिंच हे फलंदाजीत मोठी खेळी करण्यास सज्ज आहेत. मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेल स्फोटक फलंदाज आहे. मिशेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड यांचा भेदक मारा प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडण्यास सज्ज आहे. इयोन मोर्गनच्या नेतृत्वात यजमान इंग्लंडदेखील काही अनुभवी खेळाडूंच्या बळावर आपल्याच मैदानावर ही स्पर्धा जिंकण्यास उत्सुक आहे.