ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 03 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर 96 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात दक्षिण ऑफ्रिकेने दिलेल्या 299 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने 41.3 षटकात सर्वबाद 203 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणा-या श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 300 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम आमलाने शानदार शतकी खेळी केली. त्याने दोन षटकार आणि सहा चौकार लगावक 103 धावा केल्या. तर, प्लेसिसनेही 75 धावांच्या जोरदार खेळी केली. श्रीलंकेकडून युपूल थरंगाने 57 धावा केल्या, तर डिक्वेल 41, मेंडिस 11, दिनेश चंदिमल 12 आणि पेरेराने नाबाद 44 धावा केल्या.
दक्षिण ऑफ्रिकेकडून गोलंदाज इमरान ताहीरने सर्वाधिक बळी घेतले. तर, ख्रिस मॉरिसने दोन आणि रबाडा आणि मार्केलने प्रत्येकी एक बळी घेतला. श्रीलंकेकडून प्रदीपने दोन तर, लकमल आणि प्रसन्नाने प्रत्येक एक गडी बाद केला.
बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला होत आहे. आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध खेळलेले सर्व सातही वन-डे सामने जिंकले आहेत. त्यात फेब्रुवारीत झालेल्या पाच सामन्यांचा देखील समावेश आहे. 2015 च्या विश्वचषकात सिडनीत झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आफ्रिकेने लंकेला 133 धावांत गुंडाळून नऊ गड्यांनी शानदार विजय मिळविला होता.
वनडे मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची दुसरी बाजू अशी की आयसीसी स्पर्धेत त्यांचे रेकॉर्ड फारसे चांगले नाहीत. ‘चोकर्स’चा डाग पुसून काढण्यास आफ्रिकेचे खेळाडू आसुसले आहेत. आफ्रिकेने १९९८ मध्ये पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली पण हा अपवाद वगळात त्यांना एकही आयसीसी स्पर्धा अद्याप जिंकता आलेली नाही.