ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 3 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेमध्ये दुसरा सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेणा-या श्रीलंकेसमोर विजयासाठी 300 धावांचे लक्ष्य आहे. दक्षिण आफ्रिकेने सलामीवीर हाशिम आमलाचे शानदार शतक (103) आणि फा डु प्लेसिसच्या (75) धावांच्या जोरावर 6 बाद 299 धावा केल्या. श्रीलंकेकडून प्रदीपने दोन तर, लकमल आणि प्रसन्नाने प्रत्येक एक गडी बाद केला.
बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला होत आहे. आफ्रिकेने लंकेविरुद्ध खेळलेले सर्व सातही वन-डे जिंकल्या. त्यात फेब्रुवारीत झालेल्या पाच सामन्यांचा देखील समावेश आहे. २०१५च्या विश्वचषकात सिडनीत झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आफ्रिकेने लंकेला १३३ धावांत गुंडाळून नऊ गड्यांनी शानदार विजय मिळविला होता.
वन डे मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या आफ्रिकेची दुसरी बाजू अशी की आयसीसी स्पर्धेत त्यांचे रेकॉर्ड फारसे चांगले नाहीत. ‘चोकर्स’चा डाग पुसून काढण्यास आफ्रिकेचे खेळाडू आसुसले आहेत. द. आफ्रिकेने १९९८ मध्ये पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली पण हा अपवाद वगळात त्यांना एकही आयसीसी स्पर्धा अद्याप जिंकता आली नाही.
आफ्रिकेचा संघ संतुलित आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील फलंदाज डिव्हिलियर्स आणि नंबर वन गोलंदाज कासिगो रबाडा हे दोघेही त्यांच्या संघात आहेत. अनुभवी हाशिम अमला, डुप्लेसिस, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, व्हेन पार्नेल हे सर्व हुकमी खेळाडू आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये या संघाचे चार फलंदाज आणि दोन गोलंदाज पहिल्या दहा जणांत आहेत.