ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 8 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल आटोपलेल्या बंगळुरू कसोटीनंतर सुरू झालेला डीआरएस विवादाप्रकरणी आज आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. या वादाकडे कानाडोळा करत आयसीसीने या प्रकरणी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांच्यापैकी कुणावरही कारवाई होणार नसल्याचे आज सांगितले. त्यामुळे कालपासून दोन्ही संघ आणि आजी-माजी क्रिकेटपटूंकडून पेटवण्यात आलेला डीआरएस विवाद आता थांबण्याची शक्यता आहे.
मंगळवारी आटोपलेल्या बंगळुरू कसोटीत कोणत्याही खेळाडूकडून आयसीसी कोड ऑफ कंडक्टचा भंग झालेला नाही. त्यामुळे सामन्यादरम्यान मैदानात घडलेल्या दोन्ही घटनांचा विचार करून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ पायचीत झाल्यानंतर त्याने या निर्णयाबाबत ड्रेसिंग रूमच्या दिशेने खाणाखुणा करून मत मागविले होते. पण स्मिथची ही चतुराई लक्षात आल्यावर विराट कोहलीने त्याला तीव्र आक्षेप घेतला होता. दरम्यान, पंचांनी मध्यस्ती करत स्मिथला तंबूत परतण्याचा इशारा केला होता. त्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलियन संघाविरोधात आयसीसीकडे लेखी तक्रार केली होती. "आम्ही व्हिडीओ पाहिला आहे. ज्यात स्टिव्ह स्मिथ जाणूनबुजून ड्रेसिंग रुमकडे इशारा करत सल्ला मागतो आहे. त्यामुळे आम्ही खंबीरपणे कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियासोबत उभे आहोत. विराट कोहली हा एक परिपक्व आणि अनुभवी क्रिकेटर आहे. मैदानावरील त्यांची वागणूक ही दुस-यांसाठी उदाहरण आहे." असे बीसीसीआयने म्हटले होते. त्यावेळी विराटच्या प्रतिक्रियेला मैदानावरील पंच निजल लाँग यांनी समर्थन दिलं होतं आणि ते स्मिथला रोखण्यासाठी त्याच्याजवळ गेले होते. बीसीसीआयनं आयसीसीकडेही यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात असे वाद नेहमीच होत असतात. यापूर्वी 2008च्या मालिकेमध्येही मंकीगेटवरून असाच वाद झाला होता.
ICC says it will not be taking any action against Virat Kohli and Steve Smith #INDvsAUSpic.twitter.com/2BVOKmV7Wn— ANI (@ANI_news) March 8, 2017