दुबई : बीसीसीआयने विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमच्या खेळपट्टीची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी आयसीसीने मात्र व्हीसीएच्या जामठा स्टेडियम प्रशासनाला खेळपट्टीबाबत ‘अधिकृत ताकीद’ दिलेली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेली खेळपट्टी सुमार दर्जाची होती, असा शेरा सामनाधिकाऱ्यांनी नोंदविला होता. जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून चेंडू अधिक वळत असल्याचे निदर्शनास आले. जामठा स्टेडियम आयसीसी व बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचे गृहमैदान आहे. आयसीसीचे महासंचालक ज्योफ एलार्डिस आणि आयसीसीचे मुख्य मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी सामन्याचे व्हिडिओ फुटेज, क्रो यांचा अहवाल व बीसीसीआयचे उत्तर यांचा विचार केल्यानंतर निर्णय घेतला. नागपूरच्या खेळपट्टीबाबत माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. त्यात आॅस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन व इंग्लंडचा मायकेल वॉन यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश होता. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली व संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी मात्र खेळपट्टीची पाठराखण केली होती. खेळपट्टीमध्ये काहीच चुकीचे नसल्याचे त्यांनी म्हटले होते. (वृत्तसंस्था)
आयसीसीचा व्हीसीएला दणका
By admin | Published: December 22, 2015 3:05 AM