ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ३० - आयसीसीच्या वर्ल्ड कप संघात भारतातील एकाही क्रिकेटपटूला स्थान मिळू शकलेले नाही. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमला वर्ल्डकप संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे.
रविवारी वर्ल्डकपची दिमाखात सांगता झाल्यावर सोमवारी सकाळी आयसीसीने वर्ल्ड कप इलेव्हन संघ जाहीर केला आहे. वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात न्यूझीलंडच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाचे तीन, दक्षिण आफ्रिकेचे दोन, श्रीलंका व झिम्बाब्वेतील प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात भारताच्या एकाही क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही. भारताचे गोलंदाज उमेश यादव, मोहम्मद शमी व उमेश यादव, इम्रान ताहिर, वहाब रियाझ हे खेळाडूही स्पर्धेत होते. पण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. या सर्वांना अंतिम संघात स्थान देणे अशक्य होते असे आयसीसीने स्पष्ट केले.
वर्ल्डकपमध्ये सलग सात सामने जिंकणा-या भारतीय संघाच्या एकाही खेळाडूचा संघात समावेश नसल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींनी नाराजी दर्शवली आहे.
आयसीसीने जाहीर केलेला वर्ल्ड कप इलेव्हन संघ खालील प्रमाणे -
ब्रँडन मॅक्यूलम (कर्णधार)
फलंदाज - मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड), स्टिव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), कोरी अँडरसन (न्यूझीलंड)
गोलंदाज - डेनियल व्हिटोरी (न्यूझीलंड), मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), मोर्ने मॉर्केल (दक्षिण आफ्रिका)
विकेट किपर - कुमार संगकारा
१२ वा खेळाडू - ब्रेंडन टेलर