ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाने आनंदीत झालेल्या कर्णधार विराट कोहलीने हा आतापर्यंतचा सर्वोत्तम मालिका विजय असल्याचे म्हटले आहे. मालिकेमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या शाब्दीक वादावादीबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. आम्ही शिखरावर असू किंवा नसू कोणी आम्हाला डिवचले तर, आम्ही उत्तर देणारच. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे विराटला चौथ्या कसोटीत खेळता आले नाही.
बंगळुरुच्या दुस-या कसोटीत डीआरएसवरुन कोहलीने ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला लक्ष्य केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसारमाध्यमांनी कोहलीला टार्गेट केले होते. माझ्याबद्दल काय लिहीले जाते किंवा बोलले जाते याचा मी विचार करत नाही. काही लोकांना जगाच्या कुठल्या तरी एका भागामध्ये बसून मसाला तयार करायचा असतो. त्यांना परिस्थितीशी समोरुन सामना करायचा नसतो. घरी बसून ब्लॉगवर लिहीणे किंवा माइकवर बोलणे सोपे आहे पण तेच मैदानावर फलंदाजी-गोलंदाजी करणे पूर्णपणे वेगळे आहे असे कोहलीने सांगितले.
आता आमचे खरे आव्हान सुरु झाले आहे. परदेशात जर विजयी लय कायम राखता आली तर तुम्हाला माझ्या चेह-यावर मोठे हास्य दिसेल असे कोहली म्हणाला. चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव एक्स फॅक्टर होता.
ऑस्ट्रेलियन संघाने कुलदीपला पाहिले नव्हते किंवा कुलदीपची गोलंदाजी खेळली नव्हती. त्याने करीयरमधल्या पहिल्याच कसोटीत चांगली कामगिरी केली. मी या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबद्दल भरपूर बोलण्याची संधी आहे. पण त्याबद्दल माझी काही तक्रार नाही असे विराट म्हणाला.
Very easy to sit at home and write a blog, speak behind the mic, that is easier than coming out and competing on the field: Virat Kohli pic.twitter.com/mbTIpAzVU9— ANI (@ANI_news) March 28, 2017