मुंबई : पाठदुखीतून मी आता सावरली असून पुनरागमनासाठी सज्ज आहे. माझ्या कामगिरीत सुधारणा करुन २१० किलो पर्यंत वजन उचलण्यात यशस्वी ठरले, तर आगामी स्पर्धांमध्ये पदक माझेच असेल,’ असा विश्वास ‘खेलरत्न’ भारोत्तलक मीराबाई चानू हिने व्यक्त केला. मुंबईत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मीराबाईने आपला विश्वास व्यक्त केला. यावेळी युवा धावपटू हिमा दास, मुंबईकर नेमबाज हिना सिध्दू आणि महिला हॉकीपटू राणी रामपाल यांचीही उपस्थिती होती. दुखापतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सज्ज असलेल्या मीराबाईने म्हटले की, ‘रिओ आॅलिम्पिकनंतर मी माझा सराव बदलला आहे. आता मी दिवसातून तीन सत्रांमध्ये सराव करते. याआधी मी दोन सत्रांत सराव करायची. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले होते. यानंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये मी एकूण १९६ किलो वजन उचलले होते. आता खेळातील बदललेल्या नियमानुसार मला यात आणखी सुधारणा करावी लागेल. याआधी मी ४८ किलो गटात खेळायची आता मी ४९ किलो गटात खेळणार आहे. या गटात जर मी २१० किलो वजन उचलण्यात यशस्वी ठरले तर प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकण्यात मला यश येईल.’ दुखापतीविषयी मीराबाई म्हणाली की, ‘पाठदुखीमुळे मी आशियाई स्पर्धेत सहभगी झाली नव्हती. पण आता मी तंदुरुस्त असून एक आठवड्यापासून सराव करत आहे. नोव्हेंबरमध्ये होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळणार नाही. पण २०१९मध्ये होणाºया प्रत्येक स्पर्धेत मी खेळेल. जागतिक नियमांनुसार आॅलिम्पिक पात्रतेसाठी आम्हाला एकूण ९ स्पर्धांमध्ये खेळायचे आहे. माझ्याकडे अजून ६ स्पर्धांत खेळण्याची संधी आहे. यातून मला आॅलिम्पिक पात्रता मिळवायाची आहे.’ त्याचप्रमाणे, ‘अजूनही मुंबईत माझ्यावर हलके उपचार सुरु आहेत. मला आशियाई व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याचे दु:ख आहे, पण पुढील स्पर्धांसाठी मी सज्ज आहे,’ असेही मीराबाईने यावेळी म्हटले.
भारताची धावपटू हिमा दास म्हणाली की, ''जागतिक युवा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर माझे पूर्ण आयुष्य बदलले असून लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला आहे. आता आगामी स्पर्धांमध्ये नक्कीच आव्हान असतील, पण त्यासाठी मी मेहनत घेत असून खूप चांगल्याप्रकारे सज्ज व्हावे लागेल. मी सर्वच महिला खेळाडूंना सांगू इच्छिते की, आधी स्वत:हून पुढे या. खेळाच्या मार्गावर खूप चांगले लोक भेटतील त्यांच्या मदतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता. चांगली कामगिरी केल्यानंतर चांगले प्रायोजकही मिळतील.''