ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली. दि. 30 - भारतीय क्रिकेट बोर्डात आमूलाग्र बदल सुचविणा-या लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे स्वागत करीत माजी सरन्यायाधीश न्या. राममनोहर लोढा यांनी शिफारशी शंभर टक्के लागू झाल्यानंतर क्रिकेटला मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै रोजी बीसीसीआयला दिलेल्या निर्देशात लोढा समितीच्या शिफारशी सहा महिन्यात लागू करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ५ ऑगस्ट रोजी विशेष आमसभा बोलविली आहे. बैठकीत शिफारशी कशा लागू होऊ शकतील यावर चर्चा केली जाईल. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत न्या. लोढा म्हणाले,‘भारतात क्रिकेट हा धर्म बनला आहे. हा खेळ लोकांना एका सूत्रात बांधून ठेवण्याचे काम करतो. याच कारणास्तव क्रिकेटमध्ये पारदर्शीपणा आणि स्वच्छता आवश्यक आहे. मॅच
फिक्सिंगने खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला हे देखील तितकेच खरे.’
क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आम्ही काही मुद्दे सुचविले. कोर्टाने हे मुद्दे लागू करण्याची परवानगी बहाल केली आहे. सर्वच शिफारशी अमलात आल्यानंतर खेळ आणि खेळाडूंना प्रेक्षकांचे अधिक प्रेम मिळेल, अशी आशा आहे.