ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट बोर्डाची सल्लागार समिती ज्यामध्ये सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे त्यांनी अनिल कुंबळेलाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन सदस्यीय समितीची गुरुवारी रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत अनिल कुंबळेच्या जागी दुस-या प्रशिक्षकाची निवड न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिथपर्यंत बीसीसीआयचा सवाल आहे, त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार कोण प्रशिक्षक होईल याची निवड करण्याची परंपरा सुरु होईल असं सांगत अनिल कुंबळेला हटवण्यास विरोध दर्शवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयमधील एक अधिकारी जो माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो, फक्त त्यानेच कुंबळेच्या नियुक्तीला विरोध केला आहे. अन्यथा इतर सर्व बीसीसीआय सदस्यांनी कुंबळेच्याच नावाला पसंती आहे. यामध्ये बीसीसीआय अध्यक्ष सी के खन्ना आणि आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांचाही समावेश आहे. यामुळे कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढणार हे नक्की झालं आहे.
तीन सदस्यीय समितीची लंडनमध्ये जवळपास अडीच तास बैठक पार पडली. बैठकीनंतर बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांना फोन करुन आपल्याला अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय सचिन अमिताभ चौधऱी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.
"अनिल कुंबळे असो वा अथवा कोणीही, ज्याची निवड होईल त्याच्यासोबत 2019 वर्ल्ड कपपर्यंत करार करण्यात येईल", अशी माहिती अध्यक्ष सी के खन्ना यांनी दिली आहे.
प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद असून तणाव वाढत चालल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यातच बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करणा-यांमध्ये भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचादेखील समावेश होता.
मागच्यावर्षी कुंबळे कोचसाठी पात्रता पूर्ण करीत नसताना देखील त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचाच वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने मिळविलेले यश सर्वांपुढे आहे. नुकताच कोहली- कुंबळे वाद पुढे आला तेव्हा सचिन आणि गांगुली यांनी कोहलीशी चर्चा केली पण कुंबळे यांना मुलाखतीपर्यंत काहीच विचारणा करायची नाही, असे सल्लागार समितीने ठरविले असल्याचे कळते. जो कुणी नवा कोच बनेल त्या व्यक्तीकडे २०१९ च्या विश्वचषकापर्यंत दोन वर्षे पदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते.
कुंबळे यांचा वर्षभराचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी आटोपताच संपुष्टात येईल. त्यांच्यासोबत समन्वय साधण्यात त्रास होत असल्याची कोहलीसमवेत काही खेळाडूंची तक्रार होती. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न देता नव्याने अर्ज मागविण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. कुंबळे यांनी मात्र २५ मे रोजी स्वत:चा अर्ज बीसीसीआय पॅनेलकडे पाठवून दिला.