नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या व्यस्त वेळेतून वेळ देण्यास तयार असेल, तर बीसीसीआयने टीम इंडियासाठी त्याची सेवा नक्की घ्यावी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली.संघ संचालक किंवा हाय परफॉर्मन्स मॅनेजर म्हणून गांगुलीची योग्य निवड राहील काय, अशा आशयाचा प्रश्न गावसकर यांना विचारण्यात आला होता. ते पुढे म्हणाले, की गांगुलीकडे वेळ आहे किंवा नाही, यावर टीम इंडियासाठी त्याची सेवा अवलंबून असेल. सौरव व्यस्त आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचा संयुक्त सचिवदेखील आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. पण सौरवसारखी सकारात्मक विचाराची व्यक्ती वेळ देणार असेल, तर निकालही चांगलेच मिळू शकतील. सौरव हाय परफॉर्मन्स मॅनेजर बनल्यास त्याला स्वत:च्या पसंतीचे मुख्य कोच, गोलंदाजी कोच आणि क्षेत्ररक्षण कोचची गरज भासेल. भारताला पुढील दोन वर्षे उपखंडाबाहेर पूर्णकालीन दौरा करायचा नसल्याने जो कुणी हाय परफॉर्मन्स मॅनेजर बनेल त्याला खूप मेहनत घेण्याची गरज नसल्याचे गावसकर गमतीने म्हणाले. अनेक मालिका आणि सामन्यांचे आयोजन मायदेशात होणार असल्याने पुढील दोन वर्षे कोचसाठी चांगली असतील, असेही गावसकर यांनी नमूद केले.(वृत्तसंस्था)
सौरवकडे वेळ असेल, तर बीसीसीआयने त्याची सेवा घ्यावी
By admin | Published: May 19, 2015 1:38 AM