हैदराबाद येथे काही दिवसांपूर्वी एका मुलीवर बलात्कार करून तिला जाळून मारून टाकल्याची घटना घडली होता. त्यावेळी पोलीसांनी या आरोपींचे एन्काउंटर केले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देशामध्ये या गोष्टीचे तीव्र पडसाद उमटले. काही जणांनी या गोष्टीचे समर्थन करत आनंद व्यक्त केला तरी काहींनी जोरदार टीकाही केली. भारताच्या खेळाडूंनीही याबाबत आपले मत व्यक्त केले. भारताची 'फुलराणी' सायना नेहवालने या प्रकरणानंतर हैदराबाद पोलीसांचे अभिनंदन करत त्यांना सलाम ठोकला होता.
सायनाने ट्विटरच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले होते. एका पत्रकाराने सायनाच्या या मतावर टीका केली होती. या टीकेमध्ये पत्रकाराने म्हटले होते की, " तु एक आदर्शवत व्यक्ती आहे. लोकं तुझ्याकडून प्रेरणा घेतात. त्यामुळे असे वक्तव्य करणे तुला शोभत नाही. तु असे ट्विट करून लोकांची वाहवा मिळवशील, पण तुझ्यासारख्या व्यक्तीने हे करणे अपेक्षित नाही."
या टीकेवर सायनाने खरमरीत उत्तर दिले आहे. सायना म्हणाली की, " मला कोणाकडूनही कौतुकाची अपेक्षा नाही, त्यासाठी मी माझे मत व्यक्त केलेले नाही. मी जे व्यक्त केले त्या माझ्या निर्लेप भावना होत्या. त्या पिडीतेला किती वेदना झाल्या असतील, याची कल्पना कोणीही करू शकत नाही. त्यामुळे पोलीसांनी जे कृत्य केले ते मला आवडले. मला पोलीसांच्या कृत्याचा आनंद झाला आणि त्यामुळेच मी त्यांचे अभिनंदन करत त्यांना सलाम ठोकला. तुमच्या मतांमुळे बलात्कार करणाऱ्या लोकांच्या विचारसरणीमध्ये काहीही परक पडत नाही. जर त्या पिडीत मुलीकडे बंदुक असली असती तर तिने त्या बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या."