ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 3 - जागतिक क्रिकेटमध्ये स्लेजिंग करण्यात ऑस्ट्रेलियन संघ आघाडीवर आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना नामोहरम करण्याचे स्लेजिंग हे घातक अस्रच. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू माइक हसीने भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी स्लेजिंगबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात स्लेजिंग करू नका, ते तुमच्यावर उलटू शकते, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला माईक हसीने ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना दिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन दिग्गज सांघातील कसोटी मालिका आता काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे दोन्हीकडी आजी-माजी खेळाडूंकडून बोलंदाजी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माईक हसीने ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना आपल्या अनुभवातील काही गोष्टी सांगितल्या आहेत. हसी म्हणतो, विराटविरोधात शाब्दिक शेरेबाजी केल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. शेरेबाजीमुळे चिडून विराटने मोठी खेळी केल्यास त्याचा फायदा यजमान संघाला मिळू शकतो.
ऑस्ट्रेलियाकडून 79 कसोटी सामने खेळणाऱ्या हसीने यावेळी कोहलीचा उल्लेख कट्टर प्रतिस्पर्धी असा केला. "मी कोहली विरोधात शेरेबाजी करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. क्रिकेटमधील तो कट्टर प्रतिस्पर्धी आहे. त्याच्यात लढवय्येपणा आहे आणि तो आव्हान स्वीकारून प्रतिस्पर्ध्यांना समोरासमोर येऊन भिडतो,"असेही हसीने सांगितले.