‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ हा नित्यनियम आहे. टीम इंडियाने असा चमत्कार करताच सर्व जण नमस्कार करू लागले. हा तोच संघ आहे ज्याने आॅस्ट्रेलियात तीन महिन्यांचा कालावधी घालवला; पण विश्वचषकाच्या सुरुवातीपर्यंत विजय नशिबी आला नव्हता. विश्वचषकाच्या सराव सामन्यातही पराभव नशिबी आला होता. विश्वचषक सुरू होताच चमत्कार घडला. आधी पाकिस्तान आणि नंतर आपल्यापेक्षा बलाढ्य द. आफ्रिकेला चारीमुंड्या चीत करीत टीम इंडिया नमस्कारास पात्र ठरला. धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपली कामगिरी विश्वचषकासाठीच राखून ठेवली असावी, असे दिसते. आता या संघाकडे ‘चॅम्पियन’सारखे बघितले जात आहे. द. आफ्रिकेवर दमदार विजय नोंदविल्यामुळे टीम इंडिया साखळी फेरीत ब गटात अव्वल स्थानावर राहील, हे ठरले आहे. आता यूएई, आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेसारख्या संघांविरुद्ध लढत द्यायची आहे. त्यामुळेच या गटात अव्वल स्थान पटकावणे जड जाऊ नये. टीम इंडियाला साखळीत अव्वल स्थान मिळाल्यास उपांत्यपूर्व सामना अ गटात सर्वांत तळाच्या स्थानावर राहणाऱ्या संघाविरुद्ध होईल. हा संघ शक्यतोवर बांगला देश असेल. म्हणजे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा भारताचा मार्ग सहज सोपा होईल. तथापि या सर्व जर-तरच्या गोष्टी आहेत. टीम इंडियाच्या पुढील लढतीतील कामगिरीच्या आधारे या सर्व बाबी परस्पर विसंबून असतील.
अव्वल स्थानावर आल्यास उपांत्य फेरीचा मार्ग सोपा!
By admin | Published: February 24, 2015 12:14 AM