Iga Swiatek, French Open Winner: यंदाच्या टेनिस हंगामातील फ्रेंच ओपन स्पर्धा नुकतीच पार पडली. स्टार टेनिसपटूराफेल नदालला पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळालं. तर इगा स्वैतेक हिने महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. नदालचे हे १४वे फ्रेंच ओपन विजेतेपद असले तरी इगा हिच्यासाठी तिचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्यामुळे टेनिस जगतातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असताना इगाने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या वेळी तिला एका विचित्र प्रश्नाचा सामना करावा लागला पण त्याचं तिने स्मार्ट उत्तर दिलं.
पत्रकाराने तिला खेळाबद्दल बोलताना, तिचा आवडता फटका कोणता?', असा प्रश्न विचारला. पण त्यासोबतच त्याने एक विचित्र प्रश्नही विचारला. पत्रकार म्हणाला, "तू जेव्हा पार्टीसाठी बाहेर जातेस तेव्हा तू मेक-अप करतेस का? स्मार्ट आणि रूबाबदार दिसण्यासाठी इतरांप्रमाणेच तु देखील मेक-अप करत असतेस का? अनेक टेनिसपटू तासन् तास आरशासमोर उभे असल्याच्या कथा आम्ही ऐकल्या आहेत. पण मला वाटत नाही की तुझ्या नैसर्गिक सौंदर्याला मेक-अपची गरज असेल."
इगाने दिलं स्मार्ट उत्तर
पत्रकाराने तिला मोठा प्रश्न विचारला. त्यासोबतच बोलताबोलता तिच्या सौंदर्याची स्तुती केली. त्यामुळे इगा या प्रश्नाला नक्की कशाप्रकारे उत्तर देते याकडे सारेच लक्ष देऊन होते. त्यावेळी इगाने अतिशय नम्रपणे, "ओके. धन्यवाद" इतके दोन शब्द उच्चारले आणि पुढे काहीही न बोलता बाकीच्या प्रश्नांना वाट करून दिली.
दरम्यान, इगाने फायनलच्या सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफ हिला पराभूत केले. इगाने पहिला सेट ६-१ असा सरळ जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये कोकोने ३ गेम जिंकले पण अखेर ६-३ असा गुणसंख्येने इगाने बाजी मारली आणि सरळ सेटमध्ये सामना जिंकत पहिलं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.