दोहा : भालाफेकपटू अनुरानीने आशियाई अॅथलेटिक्सच्या पहिल्या दिवशी तिरंगा फडकावित रौप्य पदक पटकावले. तसेच ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पारुल चौधरीने भारतासाठी कांस्य पदक जिंकले.दुती चंदने १०० मीटर शर्यतीत स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडताना उपांत्य फेरीत स्थान मिळवले. मात्र, ४०० मीटर शर्यतीत स्टार धावपटू हिमा दास पाठीच्या दुखापतीमुळे शर्यत पूर्ण करु शकली नसल्याने भारताच्या पदरी निराशा आली. २६ वर्षीय अनुने ६०.२२ मीटरची भालाफेक करत रौप्य यश मिळवले. चीनच्या लियू हुइहुइ हिने सुवर्ण पदक जिंकताना ६५.८३ मीटर भाला फेकला. याच स्पर्धेतील अन्य भारतीय शर्मिला कुमारी (५४.४८ मीटर) सातव्य स्थानी राहिली.दुसरीकडे, ५ हजार मीटर शर्यतीत २४ वर्षीय पारुलने १५ मिनिट ३६.०३ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक पटकावले. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीही ठरली. अन्य भारतीय धावपटू संजीवनी जाधवने १५ मिनिट ४१.१२ सेकंदासह चौथ्या स्थानी समाधान मानले. मुतिली विंफ्रेड यावी (१५:२८.८७) आणि बोंतु रेबितू (१५:२९.६०) या बहारीनच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. त्याचप्रमाणे, सरिताबेन गायकवाड आणि एम. अर्पिता यांनी महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत, तर एम. पी. जाबिर याने पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत अंतिम फेरी गाठली.याआधी दुती चंदने ११.२८ सेकंद वेळेची नोंद करीत महिलांच्या १०० मीटर चौथी हिट जिंकली. तिने ११.२९ सेकंद वेळेचा आपला राष्ट्रीय विक्रम मोडला. हा विक्रम तिने गेल्या वर्षी गुवाहाटीमध्ये नोंदवला होता. तिला विश्वचॅम्पियनशिप पात्रता निकष ११.२४ सेकंद वेळेची नोंद करता आली नाही. जिन्सन जॉन्सन (८०० मी.), मोहम्मद अनस व राजीव अरोकिया (४०० मी.), प्रवीण चित्रवेल (तिहेरी उडी), गौतमी एम (१५०० मी.) यांनी आगेकूच केली. (वृत्तसंस्था)महाराष्ट्राच्या अविनाशचा पराक्रम..अखेरच्या फेरीमध्ये चौथ्या स्थानावर असताना मोक्याच्यावेळी कमालीचा वेग वाढवलेल्या अविनाश साबळेने ३ हजार स्टिपलचेज स्पर्धेत रौप्य जिंकले. पुणेकर अविनाशने भारतासाठी पदकाची कमाई करताना ८ मिनिटे ३०.१९ सेकंदाची वेळ नोंदवली. पटियाला येथे झालेल्या फेडरेशन कप स्पर्धेत अविनाशने सुवर्ण जिंकताना राष्ट्रीय विक्रम रचत ८:२८.९४ सेकंदाची वेळ नोंदवून त्याने आशियाई स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती.
भालाफेकपटू अनुरानीचे शानदार रौप्य यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 3:52 AM