सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय शिलेदारांनी पदकाचे खाते उघडले आहे. भारताने कमी कालावधीत दोन पदकांवर आपले नाव कोरले. ही दोन्ही रौप्य पदके असून यानंतर लगेचच भारतीय खेळाडूंनी पदकांचा 'पंच' मारला. नेमबाजीत भारताने दिवसातील पहिले पदक जिंकले. तर उर्वरित ३ पदके रोईंग या खेळात जिंकली. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारताने रौप्यपदक जिंकले. दुसरे रौप्य पदक रोईंगमध्ये जिंकले, जिथे भारतीय पुरुषांनी लाइटवेट प्रकारात पदक जिंकण्याचा कारनामा केला. याशिवाय रोईंगमध्ये भारतीय खेळाडूंना एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकण्यात यश आले. खरं तर भारताने नेमबाजीतही दिवसातील पाचवे पदक जिंकले.
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने नेमबाजीतून आपल्या पदकाचे खाते उघडले. नेमबाजीत भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकले. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले, ज्यामध्ये रमिताने ६३१.९ गुण मिळवले. मेहुलीने ६३०.८ तर आशीला ६२३.३ गुण मिळवण्यात यश आले.
१२ हजारहून अधिक खेळाडूंचा सहभाग २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारताचे ६५५ शिलेदार रिंगणात आहेत. ६५५ भारतीय खेळाडू ४० विविध खेळांमध्ये देशाचे प्रधिनिधित्व करत आहेत. यापूर्वी जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ५७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४५ देशांतील १२ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. खरं तर यापूर्वी २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेट हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग होता, परंतु बीसीसीआयने आपला संघ पाठवला नव्हता. मात्र, यावेळी बीसीसीआयने यावेळी आपले पुरुष आणि महिला दोन्ही संघ पाठवले आहेत.