बन्सबेरिया (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमधील बन्सबेरिया (जि. होगळी) येथे सुरु असलेल्या ४१ व्या राष्ट्रीय कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी ओडिसाला तर महाराष्ट्राच्या कुमारांनी दिल्लीला नमवून दुहेरी सुवर्णमय कामगिरी केली. महाराष्ट्राचा हा सलग आठवा दुहेरी मुकुट ठरला असून कुमारांचे ३३ वे तर मुलींचे २४ वे अजिंक्यपद आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार उस्मानाबादच्या किरण वसावेला वीर अभिमन्यू तर सोलापूरच्या प्रीती काळेला जानकी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
बन्सीबेरी येथील खामरपारा सिशू संघ मैदानावर हे सामने सुरु आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राने ओडिसाचा १६-१० असा ६ गुणांनी धुव्वा उडवत रुबाबात अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्रातर्फे प्रीती काळे (२.३०, २ मि. संरक्षण व ४ गुण ), दीपाली राठोड (२.२०, २ मि. संरक्षण व २ गुण ), संपदा मोरे (१.५०, २ मि. संरक्षण व ३ गुण ), वृषाली भोये (३ गुण) यांच्यासह कर्णधार अश्विनी शिंदे (१.२०, २ मि. संरक्षण ) यांनी विजयात बहारदार कामगिरी करत सलग विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला. प्रीती काळेने पाचव्या गुणासाठी ओडिसाला चांगलेचं झुंजवले. पराभूत ओडिसातर्फे शुभश्री (२.१०, १.१० मि. संरक्षण व १ गुण ), स्मरणीका (१, २.४० मि. संरक्षण व २ गुण ) यांनी कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र विजयश्रीने यशाचे दान महाराष्ट्राच्या पराड्यात टाकले.
कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर २२-१४ असा ८ गुणांनी विजय मिळवत दमदार कामगिरीची नोंद केली. किरण वसावे (१.५०, २.१० मि. संरक्षण व ३ गुण), सूरज झोरे (१.३०, १ मि. संरक्षण व ४ गुण), विवेक ब्राम्हणे (१.२० मी संरक्षण व ५ गुण), निखिल सोड्ये (१.४०, १.३० मि. संरक्षण), चेतन बिका (१.२० मी. संरक्षण व २ गुण) असा खेळ केला. पराभूत दिल्ली तर्फे मिरजुल (२ मी. संरक्षण व ९ गुण), दीपेंद्र (१,१.२० मी. संरक्षण) असा खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या चौफेर खेळीने सलगा विजयाची मालिका कायम राहिली.
सुवर्णमय कामगिरीची अशी ही हॅटट्रिकखो-खो फेडरेशनचे सहसचिव व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची बन्सबेरिया येथील स्पर्धेतील सहभागाची आगळी वेगळी हॅट्रिक आहे. ते म्हणाले, १९८८-८९ साली बंसबेरिया येथे झालेली स्पर्धा माझ्या आयुष्यातील पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा. खेळाडू म्हणुन सहभागी होऊन रौप्यपदक प्राप्त केले. त्याच मैदानावर २००५-०६ साली १७ वर्षानंतर सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र महिला संघाचा प्रशिक्षक म्हणुन सहभाग आणि आज त्याच मैदानावर देशाच्या संघटनेचा पदाधिकारी म्हणुन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. या स्पर्धेतही महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी सुवर्णंमय कामगिरी केली.