चेन्नई - गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही आपले वर्चस्व कायम राखताना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तब्बल ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने जबरदस्त दबदबा राखला.
दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सहा सत्रांमध्ये महाराष्ट्राने चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. हरयाणाने दोन वेळा बाजी मारली आहे.
यजमान तामिळनाडूने ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी एकूण ९८ पदके जिंकून उपविजेतेपदावर कब्जा केला. तिसऱ्या स्थानावर समाधान मानलेल्या हरयाणाने ३५ सुवर्ण, २२ रौप्य व ४६ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची कमाई केली.
जलतरणात राखले वर्चस्वजलतरणपटूंनी ११ सुवर्ण, १० रौप्य व ६ कांस्य अशी एकूण २७ पदके जिंकून महाराष्ट्राच्या विजेतेपदामध्ये मोलाची भूमिका निभावली. त्या खालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ९ सुवर्णपदकांसह १७ पदके पटकावली. कुस्तीमध्ये महाराष्ट्राने ४ सुवर्णपदकांसह १४ पदकांची कमाई झाली. ॲथलेटिक्समध्ये १२, तर वेटलिफ्टिंगमध्ये १३ पदके पटकावत महाराष्ट्राने शानदार कामगिरी केली. योगासनँमध्येही महाराष्ट्राने एकूण ११ पदकांची कमाई केली.