ठाणे : विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड व नंदुरबार आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारत उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.
कुमार गटात या स्पर्धेत प्रथमच मुंबई उपनगर पश्चिम व पुर्व अशे दोन संघ खेळले होते. पहिल्या उपांत्य पुर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात मुंबई उपनगर पश्चिम संघाने उपनगर पुर्व संघावर ३१-२८ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला उपनगर पश्चिम संघ १३-१८ पिछा़डीवर होता. उपनगरच्या रजत सिंग व दिनेश यादव यांनी मध्यंतरानंतर जोरदार हल्ला खेळ करीत आपले आक्रमण वाढविले व आपली पिछाडी भरून काढली. त्यांना ओम खुडले व अभिजित वधावल यांनी पकडी घेतल्या.
उपनगर पुर्वच्या प्रसाद पानसरे व सुबोध शेलार यांनी जोरदार खेळ केला. तर रोशन शेडगे व रुपेश जाधव यांनी पकडी घेतल्या प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. पुणे ग्रामीण संघाने रायगड संघावर ३७-२९ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे १८-१५ अशी निसटती आघाडी होती. मात्र पुणे ग्रामीण संघाच्या विकास जाधव, विजय हेगडकर यांनी उत्कृष्ठ खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या उपात्य पुर्व फेरीच्या सामन्यात पिंपरी चिंचवड संघाने सांगली संघाचा ४१-२६ असा पराभव केला.
मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे २५-११ अशी चांगली आघाडी होती. चौथ्या सामन्यात नंदुरबार संघाने कोल्हापूर वर ३८-२८ अशी मात केली. मध्यतराला नंदुरबार संघाकडे १९-८ अशी आघाडी होती. नंदुरबारच्या असिम शेख व सुशांत शिंदे यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.