- दीपक शिंदे
फलटण : राष्ट्रीय किशोर-किशोरी 32 व्या खो-खो स्पर्धेत दोन्ही गटांत महाराष्ट्राने डावाने बाजी मारली असून महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकावर एक डाव चार गुणांनी विजय तर महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कर्नाटकावर एक डाव सात गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राच्या विजयानंतर फलटणकरांनी मोठा जल्लोष करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. बक्षीस वितरण समारंभही मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
फलटण येथील माजी आमदार दिवंगत विजयसिंहराजे ऊर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर राष्ट्रीय खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या बक्षीस वितरण व समारोप समारंभ विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, राज्य क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त सुहास दिवसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव चंद्रजित जाधव, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो- खो असोसिएशनचे सचिव महेंद्र गाढवे यांच्या उपस्थितीत झाला.
फलटणला खो-खोची मोठी परंपरा असून येथे ३२ वी किशोर-किशोरी खो-खो स्पर्धेचे खूप यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. फलटणकरांनी आणि सर्व खो- खो प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेळाडूंनी सर्व नियोजनावर आनंद व्यक्त केला आहे. भविष्यातही मोठमोठ्या स्पर्धा फलटणला भरविण्याची क्षमता आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी या स्पर्धेत सांघिक खेळाच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. महाराष्ट्राचे खेळाडूंचे मी अभिनंदन करतो.
भविष्यात कोणतीही स्पर्धा असेल तर त्यामध्ये फलटणकर मागे राहणार नाहीत. सातारा जिल्ह्यामध्ये क्रीडा विभाग उत्तमरित्या कार्यरत आहे. त्यामध्ये फलटणला होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धा या अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाल्या आहेत, असे मत माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवराजे नाईक निंबाळकर व आभार सचिव ॲड. गोविंद शर्मा यांनी मानले.
दिमाखदार खेळाने जिंकली उपस्थितांची मनेखो खो स्पर्धामध्ये मुलींचा महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला असला तरी या संघात बहुसंख्य मुली या फलटणच्या होत्या. त्यामुळे स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुलींच्या संघाने कर्नाटकचा धुव्वा उडवताच जल्लोष करण्यात आला. दोन्ही गटांत महाराष्ट्राच्या मुलामुलींनी बाजी मारल्याने जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अत्यंत दिमाखदार खेळ करून उपस्थितांची मने जिंकली.