पाकिस्तानविरुद्धची प्रत्येक लढाई भारताला जिंकायची असते, मग ती लढाई सीमारेषेवरील असो किंवा क्रिकेटच्या मैदानातील. प्रत्येक भारतीयाचं स्वप्न हे विजयी होण्याचं असतं. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात क्रिकेटसारखाच थरार फुटबॉलच्या सामन्यातही पाहायला मिळाला. फुटबॉल टूर्नामेंट दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF Cup) कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये काँटे की टक्कर फूटबॉल चाहत्यांनी अनुभवली.
स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ४-० ने मात दिली. या विजयाचा शिल्पकार आणि मॅन ऑफ द मॅच सुनिल छेत्री ठरला. छेत्रीने गोलची हॅट्रीक करत अफलातून खेळ केला. सोशल मीडियावरही सुनिल छेत्री, पाकिस्तान आणि हॅट्रीक हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. तर, सुनिल छेत्रीने केलेल्या हॅट्रीक गोलचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
छेत्रीच्या हॅट्रीकनंतर सोशल मीडियातूनही त्याचं कौतुक करत अभिनंदन करण्यात येत आहे. तर, छेत्रीने केलेल गोल पाहण्यासाठी नेटीझन्स आतुर झाल्याचं दिसून येतं. या सामन्यात सुनिलने १० व्या मिनिटाला पिहला गोल करत आघाडी घेतली. पाकिस्तानला अद्यापही सामन्यात वापसी करण्याची संधी होती. पण, पुन्हा १६ व्या मिनिटाला सुनिल छेत्रीने दुसरा गोल केला. हा दुसरा गोल पेनल्टी शुटआऊटने मिळाला होता. भारताने २-० अशी आघाडी घेतल्यामुळे पाकिस्तानला सामन्यात वापसी करणे कठीण बनले होते. त्यामुळे, संपूर्ण टीमवर दबाव होता. पिहल्या हाफमध्ये टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतल्यामुळे भारतीय संघात आत्मविश्वासही बळावला होता.
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने तगडी टक्कर देत पाकिस्तानला गोल करण्यापासून रोखले. याउलट सुनिलने ७४ व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. सुनिल अशारितीने पाकिस्ताविरुद्ध सामन्यात हॅट्रीक करत आपला जलवा दाखवून दिला. भारताचे तीन गोल झाल्यामुळे पाकिस्तान वापसी करणे अशक्यप्राय बनले होते. त्यानंतर, फूटबॉल टीम इंडियाचा स्टार खेळाडू उदंता सिंह कुकुम याने ८१ व्या मिनिटाला चौथा गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे, टीम इंडियाने पाकिस्तानला ४-० ने नमवत मोठा विजय मिळवला.