IND vs PAK Hockey Final, Junior Asia Cup 2024: भारतीय ज्युनियर हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ५-३ असा पराभव केला. या विजयात अरायजितसिंग हुंदलची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने स्फोटक खेळ करत ४ गोल केले. त्याच्या मदतीने गतविजेत्या भारताने बुधवारी झालेल्या पुरुषांच्या ज्युनियर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात विजय मिळवला.
भारताने एकूण पाचव्यांदा विजेतेपद पटकावले
आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पाचवे विजेतेपद आहे. यापूर्वी भारताने 2004, 2008, 2015 आणि 2023 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. कोविडमुळे 2021 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. सामन्यात हुंदलने चौथ्या, १८व्या आणि ५४व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले आणि ४७व्या मिनिटाला मैदानी गोल केला. भारतासाठी दुसरा गोल दिलराज सिंगने (१९व्या मिनिटाला) केला. तर पाकिस्तानकडून सुफियान खानने (३०व्या आणि ३९व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, आणि हन्नान शाहिदने तिसऱ्या मिनिटाला मैदानी गोल केला.
असा रंगला सामना
पाकिस्तानने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. तिसऱ्याच मिनिटाला शाहिदच्या मैदानी गोलने आघाडी घेतली. काही सेकंदांनंतर भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला, हुंदलने पाकिस्तानच्या गोलकीपरच्या उजव्या बाजूने केलेल्या शक्तिशाली ड्रॅग फ्लिकसह गोल केला नि सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपला खेळ सुधारला आणि त्याला १८व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला जो हुंदलने गोलमध्ये रुपांतरित केला. एका मिनिटानंतर दिलराजने केलेल्या उत्कृष्ट मैदानी गोलने भारताची आघाडी ३-१ अशी वाढली. ३०व्या मिनिटाला एक आणि ३९ व्या मिनिटाला दुसरा असे सुफियानच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलमुळे पाकिस्तानने सामना पुन्हा बरोबरीत आणला.
भारताने ४७व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर जिंकला पण हुंदलचा तो फटका पाकिस्तानचा गोलरक्षक मुहम्मद जंजुआने वाचवला. तरीही हुंदलने काही सेकंदांनी मैदानी गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. भारताने शेवटच्या १० मिनिटांत पाकिस्तानवर जोरदार दबाव आणला आणि आणखी काही पेनल्टी कॉर्नर जिंकले. त्यात हुंदलने पुन्हा एकदा शानदार व्हेरिएशन गोल करून संघाला ५-३ असा विजय मिळवून दिला.