India vs Pakistan, SAFF Championship football: क्रीडा क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले की, सामना रंगणारच. क्रिकेटमध्ये अनेकदा भारत-पाक सामना आणि त्यातील काही क्षणांची चर्चा होते. फुटबॉलमध्येही जेव्हा दोन्ही देश आमनेसामने आले, तेव्हा हा सामनाही रंगतदार झाला. सध्या भारतात SAFF कप ही फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जात आहे. यामध्ये सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय फुटबॉल संघाला पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करावा लागला. बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर हा मेगा सामना खेळला गेला. त्यात भारताने विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, या पराभवानंतर पाकिस्तानने कारणं द्यायला सुरूवात केली.
कर्णधार सुनील छेत्रीची हॅटट्रिक आणि उदांता सिंगच्या गोलमुळे भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला होता. या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा पूर्णपणे दिसून आला. मात्र, सामना हरल्यानंतर पाकिस्तानचा खेळाडू इसा सुलेमान कारणं देताना दिसला. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सामन्यानंतरच्या मुलाखतीत इसा सुलेमान यांनी सांगितले की, पाकिस्तानचा संघ २४ तासांच्या प्रवासानंतर येथे पोहोचला आहे आणि त्यांचे काही खेळाडू सायंकाळी ५ वाजता बेंगळुरूला पोहोचले आहेत. त्यामुळे आम्ही थकलो आणि पराभूत झालो.
पाकिस्तानी सेंटर बॅक म्हणाला, 'भारताविरुद्ध जिंकणे कठीण आणि आव्हानात्मक असते. तो एक उत्कृष्ट संघ आहे. आम्ही २४ तासांचा प्रवास केला आणि आमचे बहुतेक खेळाडू आज संध्याकाळी ५ वाजता बेंगळुरूला पोहोचले. ही सबब नसून वस्तुस्थिती आहे. मेहनत करून आम्ही पुनरागमन करू," असे तो म्हणाला.
भारताचा पुढील सामना नेपाळशी
आता SAFF चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पुढील सामना शनिवार, 24 जून रोजी नेपाळशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवरही होणार आहे. टीम इंडियाने नुकताच इंटरकॉन्टिनेंटल चषक 2023 जिंकला, ज्यामध्ये त्यांनी अंतिम फेरीत लेबनॉनचा 2-0 असा पराभव केला.