मॅकाय : खेळाडूंच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा ५७ धावांनी पराभव केला आणि वन-डे सामन्यांच्या चौरंगी मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारताने ५० षटकांत ४ बाद २६६ धावांची मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान संघाचा डाव ४४.५ षटकांत २०९ धावांत गुंडाळला. मनदीप सिंग (९५ धावा, १०८ चेंडू, ११ चौकार) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामनावीर मनदीपने कर्णधार मनीष पांडेच्या (६१) साथीने भारताला आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारून दिली. श्रेयस अय्यरने ४१ धावांची उपयुक्त खेळी केली. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी घेतला. प्रत्युत्तरात खेळाताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे फलंदाज नियमित अंतरात बाद झाले. आॅस्ट्रेलियाचा डाव ४४.५ षटकांत संपुष्टात आला. युजवेंद्र चाहलने ३४ धावांच्या मोबदल्यात ४, तर धवल कुलकर्णी, करुण नायर व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघातर्फे कर्णधार पीट हँड््सकोंब (४३) व अॅलेक्स रोस (३४) यांनी संघाला विजयी लक्ष्य गाठून देण्यासाठी प्रयत्न केला; पण ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. संघाच्या अखेरच्या पाच विकेट केवळ २६ धावांत गेल्या. सलामीवीर कॅमरुन बॅनक्रॉफ्ट (३४) व निक मेडिन्सन (३१) यांनी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला चांगली सुरुवात करुन दिली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. भारत ‘अ’ संघाने यापूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. या वेळी अंतिम लढतीत भारतीय संघाने यजमान आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पराभव केला. मालिकेत सहभागी झालेल्या अन्य दोन संघांमध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया नॅशनल परफॉर्मन्स यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)>भारत ‘अ’ संघाचे बीसीसीआयने केले अभिनंदन मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पराभव करीत चौरंगी मालिकेत जेतेपद पटकावणाऱ्या भारत ‘अ’ संघाचे अभिनंदन केले. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले,‘आॅस्ट्रेलियात चौरंगी मालिकेत जेतेपद पटकावणाऱ्या ‘भारत ‘अ’ संघाचे अभिनंदन करतो.’भारत ‘अ’ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी युवा संघाची बांधणी चांगली केली असून, त्यामुळे भारतीय संघासाठी पर्यायी खेळाडू तयार होत आहेत, अशा शब्दांत ठाकूर यांनी प्रशिक्षक द्रविड यांची प्रशंसा केली. बोर्डाचे सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना आॅस्ट्रेलियात जेतेपद पटकावणाऱ्या संघाचे अभिनंदन करतो. युवा संघाने कामगिरीत सातत्य राखले असून सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले.’
भारत ‘अ’ अजिंक्य
By admin | Published: September 05, 2016 5:37 AM