कानपूर : भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान २६ जानेवारी रोजी ग्रीन पार्कमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी उभय संघ सोमवारी कानपूरमध्ये दाखल झाले. सुरेश रैनासह ज्या भारतीय खेळाडूंची केवळ टी-२० संघात निवड झालेली आहे ते खेळाडू अद्याप येथे पोहोचलेले नाहीत. भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा ४-० ने आणि वन-डे मालिकेत २-१ ने पराभव केला. हॉटेल व्यवस्थापनाने भारतीय संघाने वन-डे मालिकेत विजय मिळवल्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी लॉबीमध्ये केक ठेवला होता, पण कर्णधार विराट कोहलीसह संघातील एकाही सदस्याने केक न कापता थेट रूमचा मार्ग धरला. उभय संघातील खेळाडू दुपारी १२.४५ च्या सुमारास कोलकाताहून लखनौमध्ये दाखल झाले. त्यानंतर कडक सुरक्षाव्यवस्थेत विशेष बसमध्ये ३ वाजण्याच्या सुमारास कानपूरच्या हॉटेल लँडमार्कमध्ये दाखल झाले. हॉटेल व्यवस्थापनाने परंपरागत पद्धतीने खेळाडूंचे स्वागत केले. हॉटेल व्यवस्थापनाने लॉबीमध्ये असलेला केक कर्णधार कोहलीला कापण्याची विनंती करण्यात आली, पण ती फेटाळताना रूममध्ये जाण्यास पसंती दर्शविली. हॉटेलच्या लॉबीमध्ये महेंद्रसिंह धोनी व कोहली यांचे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे सीईओ ललित खन्ना यांनी सांगितले, की सोमवारी उभय संघ विश्रांती घेणार आहेत. इंग्लंडचा संघ मंगळवारच्या सकाळच्या सत्रात व भारतीय संघ सायंकाळच्या सत्रात सराव करणार आहे. सामन्याच्या पार्श्वभूमीवरग्रीन पार्क स्टेडियम आणि हॉटेल परिसरामध्ये कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
भारत व इंग्लंड संघ पहिल्या टी-२० साठी कानपूरमध्ये दाखल
By admin | Published: January 24, 2017 12:34 AM