ढाका : गतविजेत्या भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी पुन्हा एकदा जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. याआधी अखेरच्या साखळी सामन्यात भारताने जपानचा ६-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ मानसिकरित्या एक पाऊल पुढे असेल. भारताचा भक्कम बचाव भेदण्यासाठी आणि आक्रमक फळीला थोपविण्यासाठी जपानला चांगलेच झुंजावे लागेल.
अखेरच्या साखळी सामन्यात जपानला मोठ्या अंतराने नमवले असले, तरी भारतीयांना सजग राहावे लागेल. पाच देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ १० गुणांसह अव्वल स्थानी असून, कोरिया दुसऱ्या स्थानी आहे. जपान आणि पाकिस्तान प्रत्येकी ५ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. यजमान बांगलादेश अखेरच्या स्थानी असून, त्यांना गुणांचे खाते उघडता आले नाही.
उपकर्णधार हरमनप्रीत सिंग शानदार लयीमध्ये असून, मध्यरक्षक मनप्रीत आणि हार्दिक सिंग यांनीही चांगला खेळ केला आहे. याशिवाय दिलप्रीत सिंग, जरमनप्रीत सिंग, आकाशदीप सिंग आणि शमशेर सिंग यांचे आक्रमण रोखणे जपानला सोपे जाणार नाही.