वेनाड : श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेसाठी अनेक आघाडीचे खेळाडू राष्ट्रीय संघात सामील झाल्यानंतर अंबाती रायडूच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’च्या युवा संघापुढे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या पहिल्या चार दिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करण्याचे आव्हान आहे. युवा खेळाडूंना या लढतीच्या निमित्ताने निवड समिती सदस्यांचे लक्ष वेधण्याची संधी मिळाली आहे. अलीकडेच चेन्नईमध्ये आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघारिुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणाऱ्या भारत ‘अ’ संघातील कर्णधार चेतेश्वर पुजारा, के. एल. राहुल, अमित मिश्रा, वरुण अॅरोन आणि उमेश यादव श्रीलंका दौऱ्यावर आहेत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारत ‘अ’ संघाची भिस्त कर्णधार रायडू, करण नायर, अभिनव मुकुंद, अंकुश बैस, बाबा अपराजित, अक्षर पटेल व कर्ण शर्मा यांच्यासारख्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून आहे. उभय संघ तिरंगी वन-डे सामन्यांची मालिका खेळल्यानंतर येथे दाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघासाठी भारत दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचे १० खेळाडू अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी पडले होते. त्यांना मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी ११ खेळाडू तैनात करणेही अडचणीचे ठरले. दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला क्षेत्ररक्षणासाठी त्यांचे संगणक विश्लेषक व भारताचा मनदीप सिंग यांची मदत घ्यावी लागली.दक्षिण आफ्रिका संघ या धक्क्यातून आता सावरला आहे. त्यांचे सर्व खेळाडू फिट आहेत. क्विंटन डीकॉकच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. त्याने तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाविरुद्ध दोन्ही लढतींमध्ये शतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांपुढे त्याला रोखण्याचे आव्हान राहील. कर्णधार डीन एल्गर, दिनिश डी ब्रएन, रिजा हेंड्रिक्स व डॅन विलास प्रतिभावान फलंदाज आहेत. भारतीय फलंदाजीाबाबत विचार करता मधल्या फळीची भिस्त रायडूच्या कामगिरीवर अवलंबून आहे. झिम्बाब्वे दौऱ्यानंतर प्रथमच खेळत असलेल्या बडोद्याच्या या फलंदाजाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. रायडूव्यतिरिक्त मुकुंद बैस, जीवनज्योत सिंग, बाबा अपराजित, करुण नायर व विजय शंकर या युवा फलंदाजांकडूनही चमकदार कामगिरीची आशा आहे. गोलंदाजीमध्ये कर्ण शर्मा व अक्षर पटेल यांच्यासारखे अनुभवी फिरकीपटू आहेत, तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अभिमन्यू मिथुन, शार्दूल ठाकूर व ईश्वर पांडे यांच्यावर राहील. दक्षिण आफ्रिका संघ गोलंदाजी विभागाबाबत चिंतेत आहे. लोनवाबो त्सोत्सोबे, वायने पार्नेल, केशव महाराज व मतकोजिसी शेजी यांना तिरंगी मालिकेत छाप सोडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)
भारत व दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांदरम्यान लढत आजपासून
By admin | Published: August 17, 2015 10:47 PM