रांची : वेगवान गोलंदाज दीप्ती शमाचे ६ बळी आणि वेदा कृष्णमूर्तीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी श्रीलंकेचा तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत सात गडी राखून पराभव केला. मालिकेत सलग तिसरा विजय मिळवित यजमान संघाने पाहुण्या संघाचा सफाया केला. दीप्तीने २० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. दीप्तीच्या अचूक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेचा डाव ३८.२ षटकांत केवळ ११२ धावांत संपुष्टात अला. त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीच्या नाबाद ६१ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने विजयासाठी आवश्यक धावा २९.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंका संघाला यसोदा मेंडिस (१४) आणि प्रसादनी वीराकोड्डी (१९) यांनी सलामीला ३३ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. दीप्तीने त्यानंतर सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले आणि त्यानंतर श्रीलंका संघाची घसरगुंडी उडाली. श्रीलंकेची कर्णधार शशिकला श्रीवर्धने (१४) व दिलानी मनोदरा (२३) यांनी सहाव्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली, पण संघाचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या प्रीती बोसने ८ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पूनम राऊत (०) पहिल्याच षटकात खाते न उघडताच माघारी परतली तर स्मृती मंधाना सहा धावा काढून बाद झाली. कृष्णमूर्ती व दीप्ती (२८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०९ चेंडूंना सामोरे जाताना ७० धावांची भागीदारी करीत संघाला लक्ष्याच्या समीप नेले.भारताने त्यानंतर १२३ चेंडू राखून विजय साकारला. कृष्णमूर्तीने ९० चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ६१ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था)
भारताने केला श्रीलंकेचा सफाया
By admin | Published: February 20, 2016 2:39 AM