लंडन : भारतीय हॉकी संघाला रविवारी आपल्यापेक्षा तळातील रँकिंग असणाऱ्या कॅनडाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे विश्व लीग सेमीफायनलमध्ये भारताला निराशाजनकरीत्या सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॅनडाने भारतावर ३-२ अशा गोलफरकाने सनसनाटी विजय मिळविला. भारताचा तळातील रँकिंगच्या संघाविरुद्ध हा दुसरा सनसनाटी पराभव आहे. याआधी त्यांना उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाकडून पराभवाची चव चाखावी लागली होती.गॉर्डन जोन्स्टनने तिसऱ्या आणि ४४ व्या मिनिटाला असे दोन गोल केले, तर ११व्या रँकिंगच्या कॅनडाच्या संघाकडून कीगन परेरा याने ४० व्या मिनिटाला तिसरा गोल केला.भारताकडून हरमनप्रीत सिंह (सातव्या व २२ व्या मिनिटाला) याने भारताला मिळालेल्या आठ पेनल्टी कॉर्नरपैकी २ चे गोलमध्ये रूपांतर केले. या विजयामुळे कॅनडाचा संघ स्पर्धेत पाचव्या स्थानी राहिला, तसेच भारतात भुवनेश्वर येथे होणाऱ्या विश्वकपसाठीही ते पात्र ठरले.तथापि, या पराभवामुळे सहाव्या रँकिंगच्या भारतीय संघाला या वर्षाअखेर आयोजित होणाऱ्या हॉकी विश्व लीग फायनलसाठी क्वॉलिफिकेशन आणि विश्वकप स्थानात कोणतेही नुकसान झाले नाही. कारण दोन्ही स्पर्धा या यजमान असल्यामुळे त्यांनी त्यांचे स्थान निश्चित केले आहे; परंतु रविवारचा पराभव हा निश्चित आत्मविश्वासाला तडा जाणारा ठरला आहे. भारताने साखळी फेरीत कॅनडाला ३-0 असे पराभूत केले होते; परंतु विश्वचषकातील स्थान दावेवर असल्यामुळे प्रतिस्पर्धी संघाने आज जास्त चांगली कामगिरी केली. भारताने जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवला व गोल करण्याची अनेकदा संधी निर्माण केली; परंतु कॅनडाचा संघ मिळालेल्या संधीचे सोने करण्यात जास्त सरस ठरला. (वृत्तसंस्था)
भारतीय संघ सहाव्या स्थानावर
By admin | Published: June 26, 2017 1:24 AM