कानपूर : कर्णधार उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांच्या जोरावर भारत ब संघाने देवधर चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघाला पाच गडी राखून हरविले. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारत अ संघाने ४४.२ षटकांत १६१ धावांवर नांगी टाकली. या संघाची धावसंख्या एकवेळेस ५ बाद २९ अशी होती. त्यानंतर अष्टपैलू परवेझ रसूल (६६) आणि कर्णधार अंबाती रायुडू (५८) यांनी सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागीदारी केल्यामुळे संघाला थोडीफार सन्मानजनक धावसंख्या गाठता आली.याच्या प्रत्युत्तरात उन्मुक्त चंदने केलेल्या नाबाद ७७ धावांमुळे भारत ब संघाने २९.२ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. चंदने ८२ चेंडू खेळताना ९ चौकार आणि एक षटकार ठोकला. उन्मुक्त चंदने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा पर्याय निवडल्यानंतर त्याच्या गोलंदाजांनी ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर आपले काम चोखपणे पार पाडले. धवल कुलकर्णी (९ धावांत २ बळी) आणि नत्थूसिंग (२३ धावांत ३ बळी) यांनी आघाडीचा फडशा पाडला. कसोटीपटू मुरली विजयला २२ चेंडू खेळूनही आपले खाते उघडता आले नाही. (वृत्तसंस्था)
भारत ‘ब’चा भारत ‘अ’वर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2016 2:39 AM