ऑनलाइन लोकमत
हरारे, दि.२० - झिम्बाब्वे विरुद्धच्या आजच्या दुस-या टी-20 सामन्यात भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात झिम्बाब्वेने भारताला 100 धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना भारताने नाबाद 13.1 षटकात 103 धावा केल्या.
भारताकडून सलामीवीर फलंदाज के एल राहूल आणि मनदीप सिंह यांनीच शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. के एल राहूल नाबाद 40 चेंडूत दोन षटकार आणि दोन चौकार लगावत 47 धावा कुटल्या, तर मनदीप सिंहने नाबाद 40 चेंडूत एक षटकार आणि सहा चौकार लगावत 52 धावा केल्या.
या झिम्बाब्वेने 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 99 धावा केल्या होत्या. यामध्ये झिम्बाब्वेकडून फलंदाज पाजे मूर (३१) अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. एल्टन चिगुम्बुरा आणि हॅमिल्टन मासकाद्जा यांनी प्रत्येकी दहा धावा कुटल्या. तर भारताकडून गोलंदाज बी. सरनने भेदक मारा करत चार, बुमराने तीन फलंदाज बाद केले.
तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने शनिवारी गमावला होता. मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी भारताला आज विजय आवश्यक होता.