लंडन : फार्मात असलेला गोलकीपर पी. आर. श्रीजेशच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शनिवारी वरचे मानांकन असलेल्या ग्रेट ब्रिटनचा २-१ ने पराभव केला. आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीविरुद्ध शुक्रवारी ३-१ अशी आघाडी घेतल्यानंतर ३-३ ने बरोबरीवर समाधान मानावे लागलेल्या भारतीय संघाने शनिवारी चमकदार कामगिरी केली. ब्रिटनला मिळालेल्या चारपैकी केवळ एक पेनल्टी कॉर्नरवर गोलची नोंद झाली. रिओ आॅलिम्पिकपूर्वी अखेरची प्रतिष्ठेची स्पर्धा खेळणाऱ्या भारतातर्फे मनदीप सिंग (१७ वा मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (३४ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले तर ब्रिटनतर्फे एकमेव गोल अॅश्ले जॅक्सन याने ३५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर केला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा बचाव ढेपाळला असल्याचे चित्र होते. थिमय्याने दुसऱ्याच मिनिटाला चूक केल्यामुळे ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण श्रीजेशने शॉट आणि रिबाऊंडवर उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला ब्रिटनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. जॅक्सनच्या फटक्यावर पुन्हा एकदा श्रीजेशने शानदार बचाव केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये १७ व्या मिनिटाला सुनीलने दिलेल्या पासवर मनदीपने चार बचावपटूंना गुंगारा देत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला आणि भारताचे खाते उघडले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी स्ट्रोकवर भारताने दुसरा गोल नोंदवला. भारताला ३३ व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोलची नोंद झाली नाही. रिबाऊंडनंतर चेंडू गोलक्षेत्रातच होता. भारताला पुढच्याच मिनिटाला दुसरा व त्यानंतर लगेच तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर चेंडू मिडलटनच्या शरीराला चाटून गेला. त्यावर भारताने व्हीडीओ रेफरलची मागणी केली. व्हीडीओ पंचाने भारताला पेनल्टी स्ट्रोक बहाल केला. हरमनप्रीतने त्यावर सहज गोलची नोंद केली. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर ब्रिटनने आक्रमक खेळ केला. ३५ व्या मिनिटाला जॅक्सनने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवलेला गोल पराभवातील अंतर कमी करणारा ठरला. (वृत्तसंस्था)जर्मनीची बेल्जियमशीही बरोबरीआॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीने पिछाडीवर पडल्यानंतर पुन्हा एकदा शानदार पुनरागमन करीत बेल्जियमविरुद्ध एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत शनिवारी दुसरी लढत ४-४ ने अनिर्णीत राखली. जर्मनीने शुक्रवारी भारताविरुद्ध १-३ ने पिछाडीवर असताना लढत ३-३ ने बरोबरीत सोडविली होती. आज शनिवारी बेल्जियमविरुद्ध २-४ ने पिछाडीवर असताना जर्मनीने सामना ४-४ ने अनिर्णीत राखला. मार्को मिल्टाकू (५१ वा मिनिट) आणि आॅलिव्हर कोर्न (५४ वा मिनिट) यांनी गोल नोंदवित संघाला बरोबरी साधून दिली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनी संघाच्या खात्यावर दोन लढतीनंतर दोन गुणांची नोंद आहे, तर बेल्जियमच्या खात्यावर दोन सामन्यानंतर १ गुण नोंदविला गेला आहे. बेल्जियमला शुक्रवारी कोरियाविरुद्ध २-० ने पराभव स्वीकारावा लागला.
भारताची ब्रिटनवर मात
By admin | Published: June 12, 2016 6:16 AM