Thomas Cup 2022 : भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. ७३ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियावर विजय मिळवून भारताने या स्पर्धेतील पहिलेवहिले पदक निश्चित केले होते. पण, कांस्यपदकावर समाधान न मानता भारताने आता थेट सुवर्णपदकाच्या शर्यतीत धडक मारली आहे.
पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर आक्सेल्सेनने २१-१३, २१-१३ अशा फरकाने लक्ष्य सेनवर विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात सात्विक रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी २१-१८, २१-२३, २२-२० अशा फरकाने आस्त्रूप व ख्रिस्टियानसेन या जोडीवर रोमहर्षक विजय मिळवून सामना १-१ असा बरोबरीत आणला.