कोलकता : सुंदर वॉशिंग्टनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने बांगलादेश संघावर ४ गडी आणि ८ चेंडू राखून चित्तथरारक मात करताना विजयी हॅट्ट्रिकसह तिरंगी अंडर १९ एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.बांगलादेशने दिलेल्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर रिषभ पंत आणि ईशान किशन यांनी भारताला ३३ चेंडूंतच तडाखेबंद ६७ धावांची सलामी दिली. त्यानंतर रिषभ ताळमेळाच्या अभावामुळे धावबाद झाल्यानंतर बांगलादेशने मुसंडी मारताना भारताची स्थिती बिनबाद ६७ वरून २१.४ षटकांत ४ बाद ११६ अशी केली. तथापि, वाशिग्टन सुंदर आणि अमनदीप खरे यांनी ६९ धावांची भागीदारी करताना भारताचा ९ चेंडू राखून विजय निश्चित केला. भारताने विजयी लक्ष्य ४८.४ षटकांत ६ बाद २२३ धावा करीत पूर्ण केले.पहिल्या दोन सामन्यात डावाची सुरुवात करणारा सुंदर आज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि त्याने धीरोदात्त फलंदाजी केली. चेन्नईच्या या १६ वर्षीय युवा खेळाडूने भारताचा डाव सावरला. भारताकडून रिषभ पंत याने अवघ्या २६ चेंडूंतच ९ चौकार, २ षटकारांसह ५१, वॉशिंग्टन सुंदर याने ७५ चेंडूंत ६ चौकारांसह ५0 आणि अमनदीप खरे याने ३ चौकारांसह ४२ धावांचे योगदान दिले. सलामीवीर इशान किशन याने २ चौकार, २ षटकारांसह २४ धावा केल्या.तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ५0 षटकांत ७ बाद २२ धावा केल्या. फलंदाजीत उपयुक्त योगदान देण्याआधी डावखुऱ्या सुंदरने गोलंदाजीत ६ षटकांत २५ धावा देत २ गडी बाद केले. भारताचे तीन सामन्यात १३ गुण झाले आहेत आणि त्यांनी आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी आपली जागा पक्की केली आहे. बांगलादेशचे ५ गुण झाले आहेत.उद्या बांगलादेश संघ गुणांचे खाते उघडू न शकणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. बांगलादेशकडून कर्णधार मेहदी हसन मिराज याने सर्वाधिक ९0 चेंडूंत १0 चौकार व २ षटकारांसह ८७ धावा केल्या. भारताविरुद्ध पहिल्या सामन्यात ७६ धावांत गारद होणाऱ्या बांगलादेशने आज संथ सुरुवात केली व त्यांनी पहिल्या १0 षटकांत बिनबाद २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर सुंदरने बांगलादेशला सलग दोन धक्के दिल्यामुळे त्यांची स्थिती १८.१ षटकांत ३ बाद ४७ अशी झाली. बांगलादेशचा कर्णधाराने जाकेर अली अनिक (१६) आणि मोहंमद सैफुद्दीन (३0) याच्या साथीने अनुक्रमे ६३ व ४४ धावांची भागीदारी करताना सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. (वृत्तसंस्था)
भारताची फायनलमध्ये धडक
By admin | Published: November 24, 2015 11:55 PM